कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये Bird Flu चा धोका; 4,500 कोंबड्यांचा मृत्यू
चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 425 लोकांचा मृत्यू झाला आहे
चीनमधील (China) प्राणघातक अशा कोरोना व्हायरस (Corona Virus) नंतर आता देशात, पुन्हा एकदा बर्ड फ्लूच्या (Bird Flu) धोका उद्भवला आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 425 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 20,438 लोकांना याची लागण झाली आहे. रविवारी 57 जणांचा मृत्यू झाल्याचे हुबेई प्रांताच्या स्थानिक आरोग्य आयोगाने सांगितले. त्यात आता चीनच्या हुनान (Hunan) प्रांतात कोंबड्यांमध्ये धोकादायक एच 5 एन 1 पसरण्याच्या घटना घडल्या आहेत.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने शनिवारी चीनच्या कृषी व ग्रामीण व्यवहार मंत्री यांच्याशी केलेल्या संभाषणावर आधारित, फ्लूचा प्रादुर्भाव शायोयांग शहरातील शुआनक्विंग जिल्ह्यातल्या प्रकारावरून झाल्याचे कळविले आहे.
इथल्या फॉर्ममध्ये 7,850 कोंबड्या आहेत आणि फ्ल्यूच्या संक्रमणामुळे 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग पसरल्यानंतर खबरदारीच्या उपाय म्हणून स्थानिक अधिकाऱ्यांनी 17,828 कोंबड्या मारून टाकल्या आहेत. मात्र आतापर्यंत हुनानमध्ये कोणत्याही व्यक्तीस एच 5 एन 1 संसर्गाची लागण झाल्याची माहिती नाही.
चीनी अधिकारी आधीच कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी बरेच प्रयत्न करीत असतानाच देशात बर्ड फ्लूचा धोका उद्भवला आहे. एच 5 एन 1 फ्लू विषाणूला बर्ड फ्लू म्हणूनही ओळखले जाते. यामुळे पक्ष्यांमध्ये श्वसनाचा गंभीर रोग निर्माण होतो आणि मानवांमध्ये देखील हा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये हुबेईची राजधानी वुहानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली आणि आता हा संसर्ग जगभर पसरला आहे. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना व्हायरस राज्यावरील आपत्ती! केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची घोषणा)
कोरोनाव्हायरसमुळे 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे 650 लोकांचा मृत्यू झाला होता. चीनने 12 शहरांमधील लोकांच्या प्रवासावर बंदी घातली आणि सुमारे 56 दशलक्ष लोकांना त्यांच्या घरात 'तुरुंगवास' टाकण्यास भाग पाडले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की शनिवारी याबाबत 4.562 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. चीन व्यतिरिक्त, सुमारे 25 देशांमधील शेकडो लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.