Pakistan: अविश्वास प्रस्तावापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका, 50 मंत्री बेपत्ता
28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत मतदान होणार आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणातील मोठी बातमी म्हणजे इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे 50 मंत्री अविश्वास प्रस्तावापूर्वीच बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयला (PTI) मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांची खुर्ची जाणार आहे. इम्रान खान यांच्या सरकारमधील 25 फेडरल, 19 सहाय्यक आणि 4 राज्यमंत्री बेपत्ता आहेत. संकटाच्या काळात इम्रानचे मंत्री मैदानातून पळाले आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार, आता जवळपास हे नक्की आहे. विशेष म्हणजे या संकटात अनेक जवळच्या मित्रांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाठिंबा सोडला आहे. 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत मतदान होणार आहे.
इम्रान खान वेळेआधी सार्वत्रिक निवडणुका घेऊ शकतात
पाकिस्तानी संसदेत शुक्रवारी इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव विरोधकांना मांडता आला नाही. आता सोमवारी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. दरम्यान, इम्रान सरकारने सत्तेतून बाहेर पडल्यास वेळेआधी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच विरोधकांना मात देण्यासाठी इम्रान खान निवडणुकीची खेळी खेळू शकतात. (हे देखील वाचा: Imran Khan On India: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं हिंदुस्थानचं कौतुक; म्हणाले, 'आज मी भारताला सलाम करतो')
शेख रशीद यांना लवकरच निवडणुका घ्यायच्या आहेत?
इस्लामाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रशीद म्हणाले की, विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणून इम्रान खान यांना खरोखर मदत केली आहे. अविश्वास प्रस्तावामुळे इम्रान खान यांची लोकप्रियता वाढली आहे. मी इम्रान खान यांना लवकरच निवडणुका घेण्याचे आवाहन केल्याचे राशिदने म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की लवकर निवडणुकांची कल्पना हे त्यांचे स्वतःचे मत होते आणि याकडे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफची भूमिका म्हणून पाहिले जाऊ नये.