Beirut Blast: बेरूत अपघातात झालेल्या मृतांची संख्या पोहोचली 100 वर, जवळजवळ 4000 जखमी
हे जहाज फटक्यांनी भरलेले होते व त्यामुळे झालेला स्फोट इतका भीषण होता की जणू काही बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले.
लेबनॉनची (Lebanon) राजधानी बेरूत (Beirut) येथे मंगळवारी संध्याकाळी किनाऱ्याजवळ उभे असलेल्या जहाजात भीषण स्फोट झाला. हे जहाज फटक्यांनी भरलेले होते व त्यामुळे झालेला स्फोट इतका भीषण होता की जणू काही बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले. हा स्फोट इतका भयानक होता की 10 किमीच्या परिघामधील घरांचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, यामुळे तीन मजल्यांची घरे जमीनदोस्त झाली आणि एका झटक्यात जवळील अनेक इमारती कोसळल्या. लेबनीज अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 4000 लोक जखमी झाले आहेत.
जॉर्ज किट्टानेह (George Kittaneh) या अधिकाऱ्याने सांगितले की, मृत्यूंची संख्या आणखी वाढू शकेल. बेरूतच्या बंदरात झालेल्या स्फोटात आग लागल्याने बरेच नुकसान झाले. गृहयुद्ध, इस्त्राईलबरोबरचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सहन करणाऱ्या या शहराने आतापर्यंत इतका मोठा स्फोट पहिला नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांनी पहिले तेव्हा बंदरामधून धूर अजून वाढत होता. शहरातील मुख्य रस्त्यावर कचरा पसरला होता, वाहनांचे बरेच नुकसान झाले होते आणि इमारतींचे प्रचंड नुकसान झाले होते. जखमी झालेल्या रुग्णांसाठी किंवा हरवलेल्या लोकांची बातमी मिळवण्यासाठी अनेक लोक शहरातील रूग्णालयात रात्रभर वाट पाहत होते.
एका गोदामात 2,750 टन अमोनियम नायट्रेट सहा वर्षांपासून ठेवलेले होते आणि त्यासाठी कोणताही खबरदारीचा किंवा सुरक्षेचा उपाय योजला नाही. देशात दोन आठवड्यांसाठी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. देशाचे आरोग्यमंत्री हमाद हसन यांनी या भीषण अपघाताला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे तसेच मृत्यूची संख्या वाढू शकते असा इशारा दिला आहे. लेबनीजचे पंतप्रधान हसन दियाब यांनी स्फोटानंतर लगेचच राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला आणि. ते म्हणाले की या आपत्तीसाठी जबाबदार असणाऱ्यांना लवकरच न्यायालयात दाखल केले जाईल.