Beggars On The Karachi Streets: रमजानच्या पार्श्वभूमीवर कराचीच्या रस्त्यांवर चार लाखांहून अधिक भिकारी जमले; शहरातील गुन्ह्यांमध्ये वाढ

याशिवाय जानेवारी 2024 पासून दरोडेखोरांकडून 55 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंध हायकोर्टाने याबाबत कडक अल्टिमेटम जारी केला आहे.

Beggars On The Karachi Streets (संग्रहित संपादित प्रतिमा)

Beggars On The Karachi Streets: पाकिस्तानची सत्ता इस्लामाबाद आणि रावळपिंडीतून चालत असली तरी, अर्थव्यवस्था कराचीतून (Karachi) चालते. त्यामुळे कराचीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र पाकिस्तानची आर्थिक राजधानी महिनाभरापासून भिकाऱ्यांनी (Beggars) व्यापली आहे. कराची शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, कराचीचे अतिरिक्त महानिरीक्षक (एआयजी) इम्रान याकूब मिन्हास यांनी मंगळवारी दावा केला की, रमजान महिन्यात ईदनिमित्त भिक मागण्यासाठी शहरात 3 ते 4 लाख भिकारी आले आहेत. यामुळे इथल्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे.

रमजानच्या महिन्यात पाकिस्तानातील लहान शहरे आणि गावातील भिकारी कराचीत येऊ लागले आहेत. त्यामुळे येथील गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. कराचीचे अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब मिन्हास यांनी ही चिंताजनक समस्या अधोरेखित केली आहे. कराचीवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रमजानच्या काळात कराचीमध्ये किमान 19 लोक गुन्हेगारी घटनांचे बळी ठरले आहेत. याशिवाय जानेवारी 2024 पासून दरोडेखोरांकडून 55 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंध हायकोर्टाने याबाबत कडक अल्टिमेटम जारी केला आहे. शांतता आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी न्यायालयाने अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली. न्यायमूर्ती अब्बासी यांनी शांतता भंग करणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींवरही निर्णायक कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. (हेही वाचा: Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दोन बॉम्बस्फोट, एका पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू; 20 जण जखमी)

परिस्थितीचे गांभीर्य मान्य करून, सिंधचे पोलीस महानिरीक्षक गुलाम नबी मेमन यांनी पुष्टी केली, की कराचीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करणे हे रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे मोठे आव्हान आहे. पोलीस लवकरच गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवतील, असे आश्वासन मेमन यांनी सिंध उच्च न्यायालयाला दिले आहे.