Arrest Warrant against Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात इराक कोर्टाने जारी केले अटक वॉरंट; जाणून घ्या काय आहे प्रकरण
जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी त्यांना शहीद असा दर्जा देत, या गोष्टीचा बदला घेण्याची मागणी केली होती.
गेल्या वर्षी इराणी जनरल आणि प्रभावशाली इराकी लष्कराच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे पायउतार होणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरुध्द इराकच्या एका कोर्टाने गुरुवारी अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी (Qassim Suleimani) आणि अबू माहदी अल मुहंदिस (Abu Mahdi al-Muhandis) यांच्या हत्येप्रकरणी बगदाद तपास कोर्टाच्या न्यायाधीशांनी वॉरंट जारी केल्याचे कोर्टाच्या मीडिया कार्यालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत इराणचा सर्वोच्च सैन्य कमांडर कासिम सुलेमानी इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. त्यानंतर अमेरिका आणि इराक यांच्यात मुत्सद्दी संकट उद्भवले होते आणि या दोघांमधील तणाव अजूनच वाढले.
यानंतर इराणने इराकमधील अमेरिकन सैन्याच्या तळांवर लक्ष्य ठेवून क्षेपणास्त्र हल्ले केले. या प्रकरणाबाबत अमेरिकेच्या विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सने असा आरोप केला होता की ट्रम्प यांनी इराकमध्ये इराणचा कमांडर जनरल सुलेमानी याच्यावर ड्रोन हल्ल्याची संसदेला माहिती न देता परवानगी दिली होती. आता याच हत्येच्या आरोपाखाली ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी (Ayatollah Ruhollah Khomeini) यांनी त्यांना शहीद असा दर्जा देत, या गोष्टीचा बदला घेण्याची मागणी केली होती. (हेही वाचा: डोनाल्ड ट्रंम्प यांनी अखेर मानला पराभव, 20 जानेवारीला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना सत्ता हस्तांतरित करणार)
त्यावेळी अयातुल्ला खोमेनी यांनी ट्वीट करत, आम्ही अबू महदी आणि सुलेमानी यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहतो. ते इस्लाममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे ते एक उदाहरण होते. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अल्लासाठी लढाईत घालवले असे म्हटले होते. दुसरीकडे, अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा फार मोठा पराभव झाला आहे. मात्र आतापर्यंत ट्रम्प सतत निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर आता अमेरिकेचे आउटगोइंग राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 20 जानेवारी रोजी जो बिडेन यांच्याकडे सत्ता हस्तांतरण होईल.
(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2021 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

