अलीबाबाचे संस्थापक Jack Ma यांना सरकारविरुद्ध बोलणे पडले महागात; चीन सरकारने दिला दणका
या क्रमवारीत ड्रॅगनची नजर चिनी उद्योगपती आणि अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांच्यावर पडली आहे
चीन (China) केवळ जगासमोर आपले वर्चस्वच दर्शविण्याचा प्रयत्न करीत नाही, तर देशाविरूद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याला दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. या क्रमवारीत ड्रॅगनची नजर चिनी उद्योगपती आणि अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांच्यावर पडली आहे. आता चीनने ‘मा’ यांना चिनी उद्योजक नेत्यांच्या (China's Entrepreneurial Greats) यादीतून काढून टाकले आहे. यावरून हे दिसून येते की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे सरकार व जॅक मा यांचे संबंध किती मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. चीनचे ज्येष्ठ उद्योजक जॅक मा यांच्या नावाला सरकारी मीडिया शांघाय सिक्युरिटीज न्यूजच्या पहिल्या पानावरही जागा मिळाली नाही. सरकारी माध्यमामध्ये त्यांचे नाव उद्यमी नेत्यांच्या यादीमधूनही काढून टाकले गेले आहे.
दुसरीकडे सरकारी माध्यमांनी हूवेई टेक्नॉलॉजीजचे रेन झेंगफेई, शाओमीचे लेई जून आणि बीवायडीचे वांग चुआनफू यांचे त्यांच्या योगदानाबद्दल मोठे कौतुक केले आहे. ब्लूमबर्गनुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने आपली कमाई सार्वजनिक जाहीर केली त्यादिवशीच बीजिंगच्या अधिकृत वृत्तपत्राने आपल्या संपादकीमध्ये ही यादी प्रसिद्ध केली, ज्यात जॅक मा यांचे नाव नव्हते. चिनी अधिकाऱ्यांची जॅक मा विरूद्ध विश्वासविरोधी चौकशी चालू आहे आणि त्यांनी मा यांच्या समूहाचा 37 अब्ज डॉलर्सचा आयपीओ थांबविला होता.
जॅक मा यांनी गेल्या वर्षी चीनच्या आर्थिक नियामकांवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच सरकारने बँकिंग नियमन व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना 'वृद्ध लोकांचे क्लब' म्हटले होते. त्यांच्या या टिपण्णीनंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षा संताप अजूनच वाढला होता. शी जिनपिंग यांच्या सरकारला अशी सार्वजनिकपणे केलेली टीका खटकली. या घटनेनंतर जॅक मा 2020 च्या ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. मा यांच्या टीकेनंतर चिनी सरकारनेही त्यांच्या अलिबाबा ग्रुप आणि एंट ग्रुपवरील अनेक खटल्यांचा तपास सुरू केला आहे.