Disease X: कोरोना व्हायरसनंतर जगाला आता 'डिसीज एक्स' विषाणूचा धोका; इबोलाचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाचा इशारा
या रोगांचा प्रसार संपूर्ण जगात होऊ शकतो. हा आजार कोरोना विषाणू पेक्षा घातक असून या आजारामुळे इबोलापेक्षा जास्त रुग्ण दगावले जाऊ शकतात.
Disease X: अद्याप जगभरातील कोरोना विषाणूचं (Coronavirus) संकट टळलं नाही. तोपर्यंतचं आता इबोला विषाणूचा (Ebola Virus) शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाने जगाला इशारा दिला आहे. जगाला कोरोनापेक्षाही धोकादायक अशा 'डिसीज एक्स' (Disease X) या नव्या आजाराचा सामना करावा लागणार असल्याचं वैज्ञानिक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम (Jean-Jacques Muyembe Tamfum) यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. हा आजार कोविड-19 सारखा वेगाने पसरणारा आणि इबोला विषाणूइतकाचं प्राणघातक आहे. या विषाणूमुळे जगभरात विनाश होऊ शकतो. आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय पावसाच्या प्रदेशामध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून आल्याचा दावादेखील जीन-जॅक्स यांनी केला आहे.
सीएनएनच्या पत्रकारांशी झालेल्या संभाषणात Tamfum यांनी सांगितलं की, जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकणार्या आणि जीवघेण्या विषाणूची निर्माण होण्याची शक्यता आहे. या रोगांचा प्रसार संपूर्ण जगात होऊ शकतो. हा आजार कोरोना विषाणू पेक्षा घातक असून या आजारामुळे इबोलापेक्षा जास्त रुग्ण दगावले जाऊ शकतात. कांगोमधील इगेंडे येथे एका महिलेला अचानक रक्तस्त्राव व तापाची लक्षण जाणवू लागली. त्यामुळे तिची इबोला चाचणी करण्यात आली. परंतु, तिची इबोला चाचणी नेगेटिव्ह आली. या महिलेला डिसीज एक्स आजाराची लागण झाली असल्याचा शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे, असंही Tamfum यांनी सांगितलं. (Coronavirus Pandemic सुरु झाल्यापासून जगभरात कोविड-19 चे चार स्ट्रेन आढळले- WHO)
गेल्या काही वर्षांपासून यल्लो फिव्हर, इन्फ्युएन्जा, रेबीज आणि इतर काही विषाणुंचा प्राण्यांच्या माध्यमातून मानवाला संसर्ग झाला आहे. यातील अनेक आजार उंदीर किंवा किड्यांमुळे निर्माण झाले आहेत. उंदरापासून आलेल्या प्लेगच्या साथीमुळे जगभरातील अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अलिकडे प्राण्यांपासून विविध विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचंही Tamfum यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने डिसीज एक्स हा विषाणू काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या विषाणूचा संसर्ग कोरोनापेक्षाही जलद गतीने होईल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेतील वैज्ञानिकांनी वर्तवला आहे.