Afghanistan: काबुलमध्ये लोकांच्या बचावासाठी आलेल्या युक्रेनियन विमानाचे अपहरण; इराणला नेले असल्याची माहिती
आता अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये लोकांच्या बचावासाठी आलेल्या युक्रेनियन विमानाचे (Ukraine Evacuation Plane) अपहरण (Hijack) करण्यात आले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्यानंतर दिवसेंदिवस तिथली परिस्थिती चिघळत चालली आहे. आता अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये लोकांच्या बचावासाठी आलेल्या युक्रेनियन विमानाचे (Ukraine Evacuation Plane) अपहरण (Hijack) करण्यात आले आहे. युक्रेनियन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे विमान अफगाणिस्तानात पोहोचले होते. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन (Yevgeny Yenin) यांनी मंगळवारी या विमानाचे अपहरण झाल्याची माहिती दिली. हे विमान अज्ञात लोकांनी इराणला (Iran) नेले असल्याची माहिती अहवालामधून मिळाली आहे. मंत्र्याच्या मते, हे विमान रविवारी अपहरण करण्यात आले होते.
मंत्री येवगेनी येनिन यांनी मंगळवारी सांगितले, 'गेल्या रविवारी आमचे विमान काही लोकांनी हायजॅक केले होते. मंगळवारी हे विमान आमच्यापासून गायब झाले. युक्रेनियन लोकांना एअरलिफ्ट करण्याऐवजी विमानात बसलेले काही लोक ते इराणला घेऊन गेले. आमचे इतर तीन एअरलिफ्ट प्रयत्न यशस्वी झाले नाहीत कारण आमचे लोक विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांच्या मते, अपहरणकर्ते सशस्त्र होते.
परंतु रशियन प्रसारमाध्यम इंटरफॅक्सने म्हटले आहे की, युक्रेनने अफगाणिस्तानात अपहरण केलेल्या कोणत्याही युक्रेनियन विमाणाचे वृत्त नाकारले आहे. दरम्यान, इराणने दावा केला आहे की हे विमान त्यांच्याइथे तेल घेण्यासाठी उतरले होते आणि नंतर कीवला रवाना झाले. इराणने विमानाचे अपहरण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. सांगितले जात आहे की हे विमान गेल्या आठवड्यात काबूलला पाठवण्यात आले होते.\
युक्रेनियन मंत्र्यांनी त्यांच्या विमानाचे काय झाले आणि त्यांचा देश हे विमान परत कसे आणेल किंवा युक्रेनियन नागरिक काबूलमधून कसे परत येतील हे सांगितले नाही. ते फक्त इतकेच म्हणाले की, यासाठी राजनैतिक प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी रविवारी 31 युक्रेनियन नागरिकांसह 83 लोकांना लष्करी वाहतूक विमानाने परत आणण्यात आले होते. राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले होते की युक्रेनियन सैन्यातील 12 लोक परत आले आहेत व अजूनही 100 युक्रेनियन नागरिक काबूलमध्ये अडकले आहेत.