Citi Bank च्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे बँकेचे तब्बल 6,750 कोटी बुडाले; पैसे परत मिळवण्यासाठी लढाई सुरु

डिसेंबर 2019 मध्ये बँकेने चुकून अमेरिकेतील उत्तर टेक्सासमधील महिलेच्या खात्यावर 3.7 कोटी डॉलर्सचे हस्तांतरण केले होते.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे ग्राहकांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने सिटी बँक (Citi Bank) अनेक वेळा चर्चेत आली आहे. डिसेंबर 2019 मध्ये बँकेने चुकून अमेरिकेतील उत्तर टेक्सासमधील महिलेच्या खात्यावर 3.7 कोटी डॉलर्सचे हस्तांतरण केले होते. मात्र यावेळचे प्रकरण स्वतंत्र ग्राहक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याबाबत नाही, तर यावेळी एका कर्मचार्‍याची कारकुनी चूक सिटी बँकेला 90 कोटी डॉलर्सला महाग पडली आहे. न्यूयॉर्कच्या सिटीबँकमधील कर्ज ऑपरेशन कर्मचार्‍यांनी यावेळी सौंदर्यप्रसाधने कंपनी रेवलॉनचे (Revlon) 90 कोटी डॉलर्सचे कर्ज चुकून त्याच्या विविध कर्जदात्यांना परत केले आहे.

90 कोटी डॉलर्स म्हणजे, जवळजवळ 6,700 कोटी रुपये सिटी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे चुकून ट्रान्सफर केले आहेत. आता या कॉस्मेटिक कंपनीचे कर्जदाते त्यांच्या खात्यात आलेला हा पैसा परत करण्यास तयार नाहीत. अमेरिकन बँकर रोनाल्ड पिरिलमनची रेवलॉन कंपनी जेव्हा डिफॉल्टर कंपनी म्हणून घोषित झाली, तेव्हाच ही मोठी रक्कम कर्जदात्यांच्या खात्यावर पोहोचली. कर्मचार्‍याच्या चुकीमुळे अडचणीत सापडलेल्या सिटीबँकला रेवलॉनच्या कर्जदात्यांकडून केवळ 90 लाख डॉलर्स इतकेच परत मिळाले आहेत. (हेही वाचा: Yes Bank Crisis: येस बँक, म्यूचुअल फंड, गुंतवणूकदार आणि संभ्रमीत ग्राहक यांबाबत अभ्यासकांचा दृष्टीकोन काय?)

ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्यात Symphony Asset Management, Brigade Capital Management आणि HPS Investment Partners यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी  कर्ज परत केले नाही याची पुष्टी रेवलॉनने केली आहे. कंपनीने आपल्या कर्जदात्यांना याची माहिती दिली असून, सिटी ग्रुपने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रेवलॉन आणि त्याच्या कर्जदात्यांमधील ही कर्जाची लढाई सर्वात वाईट टप्प्यात पोहोचली होती. कर्जदारांनी या कॉस्मेटिक्स कंपनीवर दावा दाखल केला आणि त्वरित कर्ज फेडण्याची मागणी केली आहे. न्यायालय कंपनीला कर्ज परत करण्याचे आदेश देईल अशी आशा कंपनीच्या कर्जदात्यांना होती. या प्रकरणात, रेवलॉनचे कर्ज प्रशासकीय एजंट, सिटीबँक यांना देखील डिफेंडर बनविण्यात आले आहे.