दिल्ली: जपानच्या 'डायमंड प्रिन्सेस' जहाजामध्ये अडकलेले 119 भारतीय मायदेशी परतले
गुरुवारी पहाटे एअर इंडियाच्या विशेष विमानाने (Air India Flight) या भारतीयांना दिल्लीमध्ये (Delhi) आणण्यात आलं आहे. हे विमान टोकियोवरून दिल्लीमध्ये दाखल झालं आहे.
जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' (Diamond Princess) क्रूझवर गेल्या 20 दिवसांपासून अडकून पडलेले 119 भारतीय मायदेशी परतले आहेत. गुरुवारी पहाटे एअर इंडियाच्या विशेष विमानाने (Air India Flight) या भारतीयांना दिल्लीमध्ये (Delhi) आणण्यात आलं आहे. हे विमान टोकियोवरून दिल्लीमध्ये दाखल झालं आहे.
या विमानामध्ये भारतीयांशिवाय श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रीका आणि पेरुच्या नागरिकांचाही समावेश आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्गही वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जपानच्या योकोहामा किनाऱ्यावर डायमंड प्रिन्सेस हे आलिशान जहाज थांबवून ठेवण्यात आलं होतं. या जहाजावर एकूण 3,711 लोक होते. त्यापैकी 138 भारतीय आहेत. भारतीयांमध्ये 132 क्रू मेंबर्स आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. या जहाजात असलेल्या काही प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. तसेच यातील 4 प्रवाशांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. (हेही वाचा - जपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू)
डायमंड प्रिन्सेस जहाजावरील प्रवाशांना येथून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. या सर्व प्रवाशांना मायदेशी परतण्यासाठी भारत सरकार जपान सरकारच्या संपर्कात होतं. या जहाजातील सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांना 14 दिवसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षण नाहीत अशा प्रवाशांना मायदेशी जाण्यास परवानगी देण्यात आली. डायमंड प्रिन्सेस जहाजावरील 132 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 16 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. मात्र, ज्या प्रवाशांनामध्ये कोरोनाची लक्षण आढळली नाहीत, अशा प्रवाशांना गुरुवारी मायदेशी पाठवण्यात आलं. त्यामुळे डायमंड प्रिन्सेस जहाजावर अडकलेल्या भारतीय प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.