100 Biological Kids: 'मला 100 पेक्षा जास्त जैविक मुले आहेत'; Telegram चा सीइओ Pavel Durov चा धक्कादायक खुलासा

सध्या जगात निरोगी शुक्राणूंची कमतरता आहे. स्पर्म डोनेशनबाबत खुली चर्चा व्हायला हवी, जेणेकरून अडचणीत सापडलेल्या जोडप्यांना मदत मिळू शकेल, असेही तो म्हणाला.

Pavel Durov

100 Biological Kids: तुम्हाला जर कोणी विचारले की, एखाद्या व्यक्तीला 100 पेक्षा जास्त मुले असू शकतात का? यावर तुमचे उत्तर, ‘कदाचित नाही’, असे असेल. परंतु मेसेजिंग ॲप टेलिग्रामचा (Telegram) संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव (CEO Pavel Durov) याने दावा केला आहे की, त्याला 100 हून अधिक जैविक मुले आहेत. त्याने ही माहिती टेलीग्रामद्वारेच दिली आहे. नुकतेच 39 वर्षीय पावेलने आपल्या 5.7 दशलक्ष सदस्यांसह ही माहिती शेअर केली.

पावेलने सांगितले की, सुमारे 15 वर्षांपूर्वी एक मित्र त्याच्याकडे आला होता. त्याच्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला मूल होऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीत त्या मित्राने पावेलला त्याचे शुक्राणू दान करण्याची विनंती केली. पावेल यासाठी तयार झाला. त्यानंतर क्लिनिकच्या डॉक्टरांनी पावेलला त्याने शक्य तितके शुक्राणू दान करण्याचे सुचवले. डॉक्टरांनी सांगितले की, यामुळे कदाचित अधिकाधिक लोकांना मदत मिळू शकेल.

पावेल पुढे म्हणाला की, सुरुवातीला त्याला ही कल्पना आवडली नाही. मात्र, त्याने शुक्राणू दान करणे सुरूच ठेवले. त्याने सांगितले की, शुक्राणू दानामुळे 12 देशांतील 100 हून अधिक जोडप्यांना मूल होण्यास मदत झाली आहे. एवढेच नाही तर स्पर्म डोनेशन थांबवल्यानंतरही त्याचे स्पर्म आयव्हीएफ क्लिनिकमध्ये ठेवले जात आहेत. पावेल दुरोव याने असेही सांगितले की, तो त्याची डीएनए माहिती सार्वजनिक करण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून त्याची जैविक मुले एकमेकांना शोधण्यात मदत करू शकतील. (हेही वाचा; Death of Indian Students Abroad: धक्कादायक! गेल्या 5 वर्षांत 633 भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू; कॅनडा, अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक)

दुरोव म्हणाला की, त्याने जे केले त्याबद्दल त्याला स्वतःचा अभिमान आहे. सध्या जगात निरोगी शुक्राणूंची कमतरता आहे. स्पर्म डोनेशनबाबत खुली चर्चा व्हायला हवी, जेणेकरून अडचणीत सापडलेल्या जोडप्यांना मदत मिळू शकेल, असेही तो म्हणाला. निरोगी शुक्राणूंबद्दल चर्चा करताना, दुरोव म्हणाला की, मला आपले कर्तव्य बजावल्याचा अभिमान आहे. अर्थात, यात जोखीम आहेत, परंतु मला दाता असल्याबद्दल खेद वाटत नाही.