आता सिमकार्डशिवाय चालतील फोन, काही मिनिटात नंबर होईल पोर्ट तर वाढेल बॅटरीचे आयुष्य

आणि हे शक्य होणार आहे इ-सिम तंत्रज्ञानामुळे

स्मार्टफोन (Photo Credits: Facebook)

येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुमची सर्वात गरजेची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्मार्टफोन हा सिमकार्ड शिवाय काम करणार आहे. होय, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या क्रांत्या पाहून तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फिजिकल सिम घालण्याची गरज उरणार नाही. आणि हे शक्य होणार आहे इ-सिम तंत्रज्ञानामुळे. सध्या हे तंत्रज्ञान फक्त आयफोनमध्ये दिसून येत आहे, मात्र येत्या काही वर्षांत इतर सर्व फोन्समध्ये सुद्धा सिम कार्डसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात येईल. आयफोनमधील हे इ-सिम तंत्रज्ञान फक्त ऑस्ट्रिया, कॅनडा, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, जर्मनी, हंगेरी, भारत, स्पेन, यूके आणि यूएस अशा दहा देशांत उपलब्ध आहे.

इ-सिम काय आहे?

इ-सिम म्हणजे 'एम्बेडेड सब्सक्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल' होय. हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सिम आहे जे प्लास्टिकच्या सिमची जागा घेईल. केवळ सॉफ्टवेअरद्वारेच तुमच्या डिव्हाइसमध्ये अथवा स्मार्टफोनमध्ये या सिमला स्थापित करता येणार आहे. त्यामुळे सिमकार्ड हे डिव्हाइसमध्ये स्वतंत्रपणे सेट केले/बसवले जाणार नाही.

इ-सिमचे फायदे -

इ सिम हे सर्वप्रथम भारतात अॅपल वॉचमध्ये वापरले गेले होते. त्यानंतर या तंत्रज्ञानाचा वापर आता मोबाईल फोनमध्ये केला जाईल. या तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त फायदा वापरकर्त्यांना त्यांचा नंबर पोर्ट करताना होणार आहे. इ-सिममध्ये कनेक्शन घेण्यासाठी नवीन सिम खरेदी करण्याची गरज नाही. कारण इ-सिम हे सॉफ्टवेअरद्वारे कार्य करेल, जेणेकरुन मोबाइलचे सिम पुन्हा वारंवार बदलण्याची गरज पडणार नाही. वापरकर्त्यांना त्यांचा नंबर बंद करण्यासाठी अथवा दुसऱ्या कंपनीचे कार्ड घेण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतील, कारण सर्व्हिस प्रोव्हायडर सॉफ्टवेअरद्वारेच आपल्या नंबरचा ऑपरेटर त्वरित बदलेल.

याशिवाय, आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीचाही वापर या इ-सिम तंत्रज्ञानामुळे कमी होणार आहे. याचा अर्थ आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीचे आयुष्य वाढणार आहे. हे तंत्रज्ञान केवळ सॉफ्टवेअरद्वारे कार्य करणार असल्याने, आपल्या स्मार्टफोनला सिम कार्ड स्लॉटची आवश्यकता भासणार नाही. यामुळे फोन तयार करणाऱ्या कंपन्यांना फोन अपग्रेड करण्यासाठी मोबाइलमध्ये अतिरिक्त जागा मिळेल.

इ-सिम तंत्रज्ञान सध्या रिलायन्स जियो आणि एअरटेल अॅपल वॉचद्वारे देशात वापरले जात आहे. तथापि, दूरसंचार विभागाने (डीओटी) या इ-सिमच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जेव्हा वापरकर्ता त्याची सिम कार्ड कंपनी बदलू इच्छित असेल किंवा नवीन कनेक्शन मिळवू इच्छित असेल तेव्हाच, इ-सिम त्याच्या स्मार्टफोनमध्ये किंवा डिव्हाइसमध्ये समाविष्ट केले जाऊ शकेल..