WhatsApp OTP Scam काय आहे? त्यापासून सुरक्षित कसे राहाल?
या अॅपचे असलेले करोडो युजर्स आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या व्हॉट्सअॅप पेमेंटमुळे व्हॉट्सअॅप युजर्स वेगवेगळ्या स्कॅम्संना बळी पडत आहेत.
सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल अॅप्लिकेशन (Mobile App) आहे. या अॅपचे असलेले करोडो युजर्स आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या व्हॉट्सअॅप पेमेंटमुळे व्हॉट्सअॅप युजर्स वेगवेगळ्या स्कॅम्संना बळी पडत आहेत. सध्या व्हॉट्सअॅप वर स्कॅमचे नवे चक्र सुरु झाले असून हॅकर्स तुम्हालाही लक्ष्य करु शकतात. व्हॉट्सअॅप हॅक करुन हॅकर्स तुमची खाजगी माहिती मिळवू शकतात. त्यामुळे नव्याने सुरु झालेला WhatsApp OTP Scam नेमका काय आहे? आणि त्यापासून सुरक्षित कसे राहाल? ते जाणून घेऊया... (WhatsApp Disappearing Messages Feature भारतीय युजर्ससाठी उपलब्ध; Android, iOS, JioPhone वर कसे वापराल हे फिचर?)
WhatsApp OTP Scam काय आहे?
या नव्याने सुरु झालेल्या स्कॅमला व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅम (WhatsApp OTP Scam) असे म्हणतात. यामध्ये ओटीपीचा वापर करुन हॅकर्स तुमचे अकाऊंट हॅक करु शकतात. यामध्ये तुमच्या व्हॉट्सअॅप वर तुमच्या एका मित्राच्या नंबरवरुन मेसेज येतो आणि इर्मजन्सीमुळे हा मेसेज पाठवला असल्याचे त्यात लिहिलेले असते. तुमच्या मित्राने चुकून तुमचा मोबाईल नंबर टाकला आणि लॉग इन करण्यासाठी प्लीज ओटीपी पाठवा, अशी खोटी कहाणी या मेसेजमध्ये सांगण्यात आली आहे. जर तुम्ही हा ओटीपी पाठवलात तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप मधून लॉगआऊट व्हाल आणि हॅकरला तुमच्या व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस मिळेल. हा अॅक्सेस मिळताच हॅकर तुमचा नंबर वापरुन तुमच्या सर्व मित्र-मंडळींना असा खोटा मेसेज पाठवू शकतो.
जर तुम्हाला तुमच्या मित्राच्या किंवा अनोळखी नंबरवरुन मेसेज आला आणि तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली तर अशा कोणत्याही नंबरशी संवाद साधू नका. यासाठी स्कॅमपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
# व्हॉट्सअॅप ओपन करा आणि वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
# सेटिंग्स मध्ये जावून अकाऊंट सिलेक्ट करा.
# 'Two-step Verification' वर क्लिक करा.
# 'Enable'वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 6 आकडी पीन नंबर दोनदा आणि तुमचा ईमेल आयडी विचारला जाईल.
# पीन नंबर आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपवर two-step authentication अॅक्टीव्हेट होईल.
# पीन बदलण्यासाठी किंवा two-step authentication बंद करण्यासाठी वरील स्टेप्स पुन्हा फॉलो करा.
तुमच्या व्हॉट्सअॅप वर two-step authentication अॅक्टीव्हेट झाल्यानंतर प्रत्येक वेळी व्हॉट्सअॅप ओपन करताना तुम्हाला तुमचा 6 आकडी पीन विचारला जाईल. हॅकर्सने जरी ओटीपी मिळवून तुमचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला तरी पीन शिवाय त्याला तुमच्या अकाऊंटची कोणतीच माहिती मिळणार नाही.