What is BiP App: WhatsApp ला टक्कर देण्यासाठी बाजारात आले नवीन बीआयपी अ‍ॅप, जाणून घ्या वैशिष्ट्ये

विशेष म्हणजे हे अॅप पीसी वापरकर्त्यांसाठी वेब व्हर्जनसुद्धा पुरवते, जे व्हॉट्सअ‍ॅप वेबसारखेच आहे

BiP App (Photo Credits-Wikimedia Commons)

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाच्या वापराचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. सामान्यत: मोबाइल फोन वापरणारा प्रत्येक माणूस सोशल मीडिया अ‍ॅप वापरतो. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) तर अतिशय लोकप्रिय आहे. मात्र नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. या नवीन धोरणासंदर्भात वापरकर्त्यांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. या धोरणामुळे आपली प्रायव्हसी राखली जात नाही असा समज करून, अनेक वापरकर्त्यांनी मोठ्या संख्येने व्हॉट्सअॅपला निरोपही दिला आहे. यामुळे व्हॉट्सअॅपला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपसारखे काम करणारे एक अॅप बाजारात आले आहे, ज्याचे नाव बीआयपी अॅप (BiP App) असे आहे.

सध्या बीआयपी अॅप वापरणाऱ्या लोकांची संख्या वाढत असलेली दिसत आहे. मात्र या अॅपबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत, जसे की, याचे संस्थापक कोण आहेत? हे नक्की कोणत्या देशातील व्यक्तींनी बनवले आहे? याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर आजच्या लेखात आपण याबाबत माहिती घेणार आहोत. तसे, बीआयपी अॅप दावा करतो की हे सुरक्षित असण्याबरोबरच विनामूल्य उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉल, फोटो, व्हिडिओसोबतच लोकेशन पाठविण्यासाठी वापरकर्ते हे अ‍ॅप वापरू शकतात.

बीआयपी अ‍ॅपच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये 100 हून अधिक भाषांमध्ये अनुवाद, वेगवेगळ्या पर्यायासोबत 10 लोकांच्या गटासाठी व्हिडिओ कॉल सुविधा समाविष्ट आहे. बीआयपी हे एक तुर्की मेसेजिंग व्यासपीठ आहे, जो बीआयपी एएस नावाच्या डेव्हलपरने तयार केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धोरणात बदल झाल्यानंतर तुर्कीसह इतरही देशांमध्ये बीआयपीला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. (हेही वाचा: Privacy Policy संदर्भातील भारताच्या प्रश्नांवर WhatsApp ने दिले स्पष्टीकरण- 'पारदर्शकता आणणे हे आमचे उद्दीष्ट')

बीआयपी अ‍ॅप सध्या आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड (Android) दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे अॅप पीसी वापरकर्त्यांसाठी वेब व्हर्जनसुद्धा पुरवते, जे व्हॉट्सअ‍ॅप वेबसारखेच आहे. दरम्यान, ऑनलाईन अनेक अहवाल दावा करत आहेत की तुर्की राष्ट्रपतींचे कम्युनिकेशन कार्यालय आणि देशाच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांचे चॅट ग्रुप स्थानिकरित्या विकसित केलेल्या बीआयपी अ‍ॅपवर हलविणे सुरू केले आहे.