UPI Down: नववर्षाच्या पूर्वसंध्येला युपीआय डाऊन; Gpay, PhonePe, Paytm वरील व्यवहार ठप्प, सोशल मिडियावर युजर्सची तक्रार
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला GooglePay, PhonePe, Paytm आणि इतर युपीआय सेवा वापरणाऱ्या लोकांना पेमेंट पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत.
सध्या देशभरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना युपीआय (Unified Payment Interface) डाऊन झाल्याची बातमी येत आहे. युपीआय ही एक इन्स्टंट रिअल टाइम पेमेंट सिस्टिम असून, ज्याद्वारे जलद व सुरक्षित पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करता येते. आता सोशल मिडियावर अनेक युजर्स तक्रार करत आहेत की, देशभरात युपीआय बंद पडले आहे. साधारण गेल्या दीड तासांपासून युपीआय डाऊन असल्याने लोकांना पैशांचे व्यवहार करत येत नाहीत. काही युजर्सनी तर सकाळपासून युपीआय बंद असल्याची तक्रार केली आहे. अशाप्रकारे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला GooglePay, PhonePe, Paytm आणि इतर युपीआय सेवा वापरणाऱ्या लोकांना पेमेंट पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत.
महत्वाचे म्हणजे नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोक घराबाहेर पडतात. अशावेळी कोणतेही छोटेमोठे व्यवहार करण्यासाठी सर्रास युपीआय प्रणालीचा वापर केला जातो. युपीआयमुळे आजकाल लोक स्वतःजवळ फार कमी रोख रक्कम बाळगतात. अशा परीस्थितमध्ये युपीआय डाऊन झाल्याने युजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यंदाच्या वर्षात युपीआय डाऊन होण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी, जून, एप्रिल आणि जानेवारीमध्ये यूपीआय सर्व्हर डाऊन झाला होता. (हेही वाचा: भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल WhatsApp ने मागितली जाहीर माफी; Minister Rajeev Chandrasekhar यांची केली होती कारवाईची मागणी)
दरम्यान, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित एक रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. भारतातील 60 टक्क्यांहून अधिक किरकोळ व्यवहार सध्या युपीआयद्वारे केले जातात. या पेमेंट सिस्टमवर बहुतांश कमी मूल्याचे व्यवहार होतात. या ठिकाणी 100 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांची संख्या ही एकूण युपीआय व्हॉल्यूमच्या 75 टक्के आहे.