IPL Auction 2025 Live

Tech Silent Layoffs: आयटी कंपन्यांमध्ये चालू आहे 'सायलंट लेऑफ'; तब्बल 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. जाणून घ्या काय आहे प्रकार

युनियनचा विश्वास आहे की वास्तविक संख्या खूप जास्त आहे आणि अद्याप त्याची आकडेवारी समोर आलेली नाही.

layoff Pixabay

Tech Silent Layoffs: जगभरात चालू असलेली तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर कपात (Tech Layoffs) ही अनेक कर्मचाऱ्यांसाठी चिंताजनक आहे. यंदा, 2024 मधील टाळेबंदीच्या लाटेचा परिणाम Google, Apple, Meta, Amazon, Paytm, Tesla सारख्या विविध टेक कंपन्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांना भोगावा लागला. भारतातही या टाळेबंदीमुळे आयटी व्यावसायिकांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. एका अहवालानुसार, भारतातील आयटी क्षेत्रात लागू केलेल्या मूक टाळेबंदीमुळे म्हणजेच सायलंट लेऑफमुळे  20,000 हून अधिक कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

ऑल इंडिया आयटी आणि आयटीइएस एम्प्लॉईज युनियन (AIITAEU) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये, आयटी क्षेत्रातील 20,000 कर्मचाऱ्यांनी 'मूक’ टाळेबंदीमध्ये नोकऱ्या गमावल्या. युनियनचा विश्वास आहे की वास्तविक संख्या खूप जास्त आहे आणि अद्याप त्याची आकडेवारी समोर आलेली नाही. ही नोकरकपात सर्व आकाराच्या आयटी कंपन्यांमध्ये झाली आहे.

काय आहे सायलंट लेऑफ?

सायलंट लेऑफची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला 30 दिवस अगोदर सांगणे की, कंपनी त्याला काढून टाकणार आहे आणि त्याने इतरत्र नोकरी शोधायला सुरुवात करावी. कर्मचाऱ्याने यासाठी नकार दिल्यास त्याला त्वरीत नोकरी सोडण्यास सांगितले जाते. कर्मचाऱ्यांना शांतपणे कामावरून काढून टाकणे, त्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास भाग पाडणे ही बऱ्याच कंपन्यांमध्ये सामान्य गोष्ट झाली आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना, नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) नुसार, 2024 मध्ये आत्तापर्यंत, केवळ लार्ज कॅप आयटी कंपन्यांमध्ये सुमारे 2,000-3,000 व्यावसायिकांना अशा प्रकारे कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मनीकंट्रोलने याबाबत अहवालात दिला आहे.

अहवालात आकाश नावाच्या 31 वर्षीय तंत्रज्ञसोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे, ज्याला कंपनीच्या व्यवस्थापक आणि एचआर एक्झिक्युटिव्हकडून 15-20 मिनिटांच्या व्हर्च्युअल मीटिंगसाठी एक ईमेल प्राप्त झाला. मिटिंगवेळी त्याला दोन पर्याय देण्यात आले- पेआउटसह त्वरीत नोकर समाप्ती किंवा चार महिन्यांच्या पगारासह स्वैच्छिक राजीनामा. आकाशला दोन्ही प्रकारे कंपनी सोडणे अवघड होते, मात्र त्याला व्हर्च्युअल मीटिंग दरम्यानच निर्णय घ्यायचा होता. त्याने मॅनेजर आणि एचआर एक्झिक्युटिव्हला विचार करण्यास थोडा वेळ मागितला व अखेर स्वेच्छेने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा: Paytm To Fire 6000 Employees: पेटीएममध्ये होणार टाळेबंदी! 6000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, जाणून घ्या कारण)

आणखी एका घटनेत कॉग्निझंटच्या श्रीराम नावाच्या कर्मचाऱ्यालाही असेच काढून टाकण्यात आले. श्रीरामसाठी कोणताही प्रकल्प नसल्याचे कारण त्याला देण्यात आले. अलिकडच्या काही महिन्यांत अशा प्रकारे हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ही नोकर कपात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात होत नसल्याने त्याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही.