ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर विकले जात होते Lawrence Bishnoi, Dawood Ibrahim यांचा गौरव करणारे टी-शर्टस; महाराष्ट्र सायबर सेलकडून Flipkartसह अनेक कंपन्यांवर गुन्हा दाखल

ही बाब समाजासाठी घटक ठरेल हा विचार करून यांच्यावर कारवाई केली गेली आहे.

Flipkart (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र सायबर सेलने (Maharashtra Cyber Crime Branch) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, अलीएक्सप्रेस, टीशॉपर आणि ईटीसी विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिम यांची छायाचित्रे असलेले टी-शर्ट विकले जात असल्याचा आरोप आहे. ही उत्पादने तरुणांमध्ये गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी म्हणून पाहिली जात आहेत, जी समाजासाठी घातक ठरू शकते. भारतीय दंड संहिता (BNS) 2023 आणि IT कायदा 2000 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. समाजात अशांतता निर्माण करून तरुणांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा मजकूर रोखणे हा कारवाईचा उद्देश आहे.

याआधी मीशोने लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट विकले होते तेव्हाही कंपनीला वादाचा सामना करावा लागला होता. वाढता वाद पाहून मीशोने या प्रकरणावर आपले अधिकृत निवेदन जारी केले होते आणि सांगितले होते की, आम्ही हे उत्पादन वेबसाइट आणि ॲपवरून काढून टाकले आहे. यावर, चित्रपट निर्माते अलिशान जाफरी यांनी याला ‘भारताच्या ऑनलाइन कट्टरतावादाचे’ उदाहरण म्हटले होते.

सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन निरीक्षणादरम्यान, असे आढळून आले की फ्लिपकार्ट, अलीएक्सप्रेस, टीशॉपर आणि ईटीसीसारख्या मार्केटप्लेससह अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिम सारख्या गुंडांचे गौरव करणारे टी-शर्ट विकत आहेत. ही बाब समाजासाठी घटक ठरेल हा विचार करून यांच्यावर कारवाई केली गेली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Meesho ने लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट वेबसाईटवरून काढले, सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर घेतला निर्णय)

महाराष्ट्र सायबर विभागाच्या म्हणण्यानुसार, 'गुन्हेगारी जीवनशैलीचा गौरव करणारे संदेश पसरवण्यासाठी अशा उत्पादनांचा वापर करणे म्हणजे, तरुणांचे मूल्य भ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तरुणाई भरकटणार असून एका पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्सवर यूएपीए अंतर्गत चार गुन्हेही दाखल आहेत. अलीकडेच त्याच्या टोळीने राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्या प्रकरणातही त्याच्या टोळीचे नाव पुढे आले होते.