World’s First Artificial Womb: आता महिलांशिवाय जन्माला येणार मुले; EctoLife ने सादर केले नवे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर (Watch Video)

EctoLife ने कृत्रिम गर्भाची रचना मानवी वेदना कमी करण्यासाठी आणि सी-सेक्शनची शक्यता कमी करण्यासाठी केली आहे. यामुळे स्त्रियांचा मृत्युदरही कमी होण्यास मदत होईल.

प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

सध्या विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. या क्षेत्रात दररोज कल्पनेपलीकडील शोध लावले जात आहेत. असाच एक शोध समोर आला आहे जो, आई आणि मुलाच्या जन्माशी संबंधित आहे. हा शोध खरंच सत्यात उतरला तर, जगातील एकही स्त्री अपत्यहीन राहणार नाही. तर या शोधानुसार आता कृत्रिम गर्भातून (Artificial Womb) मुलांना जन्म देणे शक्य होणार आहे. एका कंपनीने दावा केला आहे की, दरवर्षी 30,000 मुले अशा कृत्रिम गर्भातून जन्माला येतील.

अ‍ॅक्टोलाइफ (EctoLife) नावाच्या कंपनीने कृत्रिम गर्भाशयाच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याचा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. जगात अशा लाखो महिला आहेत ज्यांना गर्भाशय नाही किंवा अशाही काही महिला आहेत ज्या काही कारणास्तव मुलांना जन्म देऊ शकत नाहीत, परंतु आता या विज्ञानाच्या चमत्काराने त्या आई होऊ शकतात. या तंत्राचे नाव Artificial Womb Facility  असे आहे. जगातील पहिल्या कृत्रिम गर्भाप्रमाणे ते काम करेल असा या कंपनीचा दावा आहे. कर्करोग किंवा इतर गुंतागुंतीमुळे ज्या महिलांचे गर्भाशय शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आले आहे, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे.

50 वर्षांच्या अभूतपूर्व वैज्ञानिक संशोधनावर आधारित असलेल्या EctoLife ने दावा केला आहे की, हे कृत्रिम गर्भाशय वर्षाला 30,000 बाळांना विकसित करण्यास सक्षम असेल. ही संकल्पना बर्लिनस्थित जैवतंत्रज्ञानी आणि विज्ञान संप्रेषणकर्ते हाशेम अल-घैली (Hashem Al-Ghaili) यांची आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या सुविधेमुळे वंध्यत्व कमी होईल. जोडप्यांना मूल होण्यासाठी आणि एका मुलाचे खरे जैविक पालक बनण्यासाठी हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरेल.

या व्हिडीओद्वारे पाहा विज्ञानाच्या माध्यमातून मूल कसे जन्माला येईल-

 

दरम्यान, अहवालानुसार कृत्रिमरित्या मुले निर्माण करण्यासाठी कंपनी विविध प्रकारची पॅकेजेस उपलब्ध करून देईल. एलिट पॅकेज तुम्हाला भ्रूणांना कृत्रिम गर्भाशयात रोपण करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये काही बदल करण्याची अनुमती देईल. यामध्ये डोळे, केसांचा रंग, बाळाची ताकद, उंची आणि बुद्धिमत्ता अशा अनेक गोष्टी निवडल्या जाऊ शकतात. याद्वारे काही अनुवांशिक रोगही टाळता येऊ शकतात. (हेही वाचा: Man On Moon: 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल, नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी सुमारे 300,000 स्त्रिया गरोदरपणातील गुंतागुंतांमुळे मरतात. EctoLife ने कृत्रिम गर्भाची रचना मानवी वेदना कमी करण्यासाठी आणि सी-सेक्शनची शक्यता कमी करण्यासाठी केली आहे. यामुळे स्त्रियांचा मृत्युदरही कमी होण्यास मदत होईल.



संबंधित बातम्या