Surya Grahan June 2020 Timing: कंकणाकृती सूर्यग्रहण 21 जून दिवशी; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर्, नाशिक सह भारताच्या विविध शहरात नेमकी किती वाजता पाहता येणार ही खगोलीय घटना!

जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.

Surya Grahan | Photo Credits: Pixabay.com

21st June Surya Grahan 2020 Timing: जून महिन्यात यंदा चंद्रग्रहणापाठोपाठ आता सूर्य ग्रहण (Surya Grahan)देखील लागणार आहे. 21 जून दिवशी भारताच्या काही भागत सूर्यग्रहण कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहणाच्या स्वरूपात त्याला पाहता येणार आहे. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तर देशाच्या इतर भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आहे. तुम्ही देहरादून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड या भारताच्या भागांमध्ये असाल तर तुम्हांला रविवार (21 जून ) दिवशी सूर्य ग्रहणाच्या कंकणाकृती रूपाचं दर्शन होईल. तर इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 % भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%, सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरू मध्ये 37% , चेन्नई मध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.

सूर्यग्रहणाची सामान्य वेळ काय असेल?

21 जून दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सूर्यग्रहणाची वेळ

मुंबई 10:00:09 सुरू होईलआणि 13:27:05 संपेल

पुणे 10:03:00 सुरू होईलआणि 13:30:03 संपेल

नाशिक 10:03:08 सुरू होईलआणि 13:32:03 संपेल

नागपूर 10:17:09 सुरू होईलआणि 13:50:07 संपेल

(सूर्यग्रहणाच्या भारतातील इतर शहरातील नेमक्या वेळा पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

कंकणाकृती सूर्यग्रहणात कशी असते स्थिती?

सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

कंकणाकृती ग्रहण कॉंगो, सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरब, ओमान, पाकिस्तानसह भारत आणि चीनच्या उत्तर भागांमधून दिसेल. चंद्राच्या सावलीमुळे होणारे खंडग्रास ग्रहण आफ्रिका (पश्चिम आणि दक्षिण भाग वगळता) दक्षिण आणि पूर्व युरोप, आशिया (उत्तर आणि पूर्व रशिया वगळता) तसेच ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात काही ठिकाणी दिसेल.