James Webb Space Telescope: नासाने तयार केला 74,000 कोटींचे 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'; उलगडणार विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य, 25 डिसेंबरला होणार प्रक्षेपण

नासाने हबल दुर्बिणीद्वारे मोठे शोध लावले आहेत आणि आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विश्वाच्या जगात नवीन क्रांतिकारी शोध लावणार आहे

James Webb Telescope (Photo Credits: Wikimedia Commons)

खराब हवामानाच्या अंदाजामुळे नासाच्या (NASA) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे (James Webb Space Telescope) प्रक्षेपण आणखी एका दिवसाने पुढे ढकलले आहे. फ्रेंच गयानामधील कौरो स्पेसपोर्टवर उच्च-स्तरीय वाऱ्यांमुळे आता जेम्स वेब टेलिस्कोपचे प्रक्षेपण 25 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. याआधी ते ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 डिसेंबरला होणार होते. या दुर्बिणीचा व्यास 6.5 मीटर आहे, जो खूप मोठा आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला मानवाने बनवलेले 'टाइम मशीन' असेही म्हणतात. नासाने युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) यांच्या सहकार्याने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) तयार केले आहे.

ही आतापर्यंत निर्माण केलेली सर्वात मोठी, सर्वात शक्तिशाली आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक स्पेस टेलिस्कोप आहे. नासाची ही दुर्बीण विश्वाच्या जगात नवीन क्रांतिकारी शोध लावणार आहे. या दुर्बिणीमुळे खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडात निर्माण झालेल्या काही जुन्या आकाशगंगा शोधण्यात मदत होईल आणि 13.5 अब्ज वर्षांपूर्वी तारे आणि आकाशगंगा कशा अस्तित्वात आल्या हे समजून घेण्यात मदत होईल. यासह, ते जिथे जीवन शक्य आहे अशा दूरच्या आकाशगंगेतील तारे, तसेच आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह देखील शोधतील.

याद्वारे विश्वाच्या निर्मितीशी संबंधित अनेक गोष्टींचा शोध घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, एलियन खरोखरच अस्तित्वात आहेत का? किंवा ते कोणत्या ग्रहावर आहेत? अशा काही गोष्टींची माहिती मिळू शकते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप 2007 मध्ये लॉन्च होणार होती, त्यावेळी त्याचे बजेट 500 दशलक्ष डॉलर ठेवण्यात आले होते. बजेट आणि तांत्रिक कारणांमुळे त्याचे प्रक्षेपण सतत पुढे ढकलण्यात आले आणि आता ही दुर्बीण डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च केली जात आहे, ज्याचे अंदाजे बजेट 9.7 अब्ज डॉलर (73566.21 कोटी रुपये) आहे. (हेही वाचा: NASA Creates History: नासाचे अंतराळयान Parker Solar Probe ने केला सूर्याला स्पर्श; इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना)

नासाची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही जगप्रसिद्ध हबल स्पेस टेलीस्कोपची उत्तराधिकारी आहे, जी 1990 मध्ये लॉन्च झाली होती. नासाने हबल दुर्बिणीद्वारे मोठे शोध लावले आहेत आणि आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विश्वाच्या जगात नवीन क्रांतिकारी शोध लावणार आहे.