लवकरच ISRO लाँच करणार 2021 मधील पहिले मिशन; ब्राझील आणि भारत दोघांसाठी ठरणार एक मैलाचा दगड, जाणून घ्या सविस्तर
यावर्षाच्या पहिल्या अभियानाचा भाग म्हणून ब्राझिलियन उपग्रह अमेझोनिया-1 (Amazonia-1) आणि तीन भारतीय पेलोड (Indian Payloads) प्रक्षेपित करण्याची योजना आखली जात आहे.
भारताची अंतराळ संस्था इस्रो (ISRO) लवकरच आपले 2021 मधील पहिले मिशन सुरु करणार आहे. यावर्षाच्या पहिल्या अभियानाचा भाग म्हणून ब्राझिलियन उपग्रह अमेझोनिया-1 (Amazonia-1) आणि तीन भारतीय पेलोड (Indian Payloads) प्रक्षेपित करण्याची योजना आखली जात आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्रो आपले मिशन लॉंच करेल. यातील एक पेलोड भारतीय स्टार्टअपद्वारे निर्माण केला गेला आहे. चेन्नईपासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटा स्पेसपोर्ट येथून सकाळी 10.24 वाजता हे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PCLV) सी-55 मार्फत लाँच केले जाणार आहे.
अवकाश विभागातील सचिव आणि बंगळुरूमधील इस्रो मुख्यालयाचे अध्यक्ष के. सिवन यांनी शुक्रवारी 'पीटीआय-भाषा'ला पीएसएलव्हि सी-55 ची पुष्टी केली. असे म्हटले गेले आहे की प्राथमिक पेलोड अमेझोनिया-1 आहे आणि ब्राझीलने पूर्णपणे तयार केलेला पृथ्वीवर नजर ठेवणारा तो असा पहिला उपग्रह आहे. याशिवाय आनंद, सतीश धवन आणि युनिटीसॅट अशी इतर तीन पेलोडची नावे आहेत.
'आनंद' ची निर्मिती भारताच्या स्पेस स्टार्टअप पिक्सेलने केली असून, चेन्नईच्या स्पेस किड्स इंडियाने 'सतीश धवन उपग्रह' तयार केला आहे. युनिटीसॅट हे तीन उपग्रहांचे संयोजन आहे. सिवन या मोहिमेबद्दल म्हणाले, 'आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी हे खास आहे. हे अंतराळातील सुधारणांच्या नवीन युगाचा प्रारंभ करेल.' (हेही वाचा: जाणून घ्या काय नक्की काय आहे 'हायड्रोजन मिशन', ज्यासाठी एकत्र येऊ शकतात रतन टाटा, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा)
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या एलोन मस्क यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा म्हणजे इस्रोचा विक्रम मोडला आहे. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने अंतराळात नवीन विक्रम स्थापन केला आहे. एलोन मस्कच्या स्पेस एक्सने एकाच वेळी अवकाशात 143 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत व अशाप्रकारे एलोन मस्कच्या कंपनीने इस्रोचा विक्रम मोडला आहे. इस्रोने फेब्रुवारी 2017 मध्ये एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठवले होते.