Robot 'Commits Suicide': जगात पहिल्यांदाच दक्षिण कोरियामध्ये चक्क एका रोबोटने केली आत्महत्या; कामाच्या ताणाने त्रस्त असल्याचा दावा

या रोबोने आत्महत्या केल्याने गुमी शहरातील लोक निराश झाले आहेत. गुमी सिटी कौन्सिलच्या या मेहनती कर्मचाऱ्याने दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत काम केले.

Robot. Representative Image. (Photo credits: Pixabay)

Robot 'Commits Suicide': आजकाल जवळजवळ प्रत्येकजण कामाच्या ताणामुळे त्रस्त आहे. जास्त कामामुळे लोक काम-जीवन संतुलन राखू शकत नाहीत. कामाच्या ओझ्यामुळे केवळ माणूसच नाही तर यंत्रमानवसुद्धा त्रस्त झाला आहे. याबाबत दक्षिण कोरियातून (South Korea) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जगात पहिल्यांदाच दक्षिण कोरियामध्ये कामाच्या ताणामुळे एका रोबोटने (Robot) आत्महत्या केली आहे. अहवालानुसार, या रोबोटने काम करत असताना पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा रोबोट कामावर आला होता. रोबोटने आत्महत्या केल्यानंतर याचा तपास अधिका-यांच्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे.

हा रोबोट गुमी सिटी कौन्सिलमध्ये काम करत होता. या रोबोने आत्महत्या केल्याने गुमी शहरातील लोक निराश झाले आहेत. गुमी सिटी कौन्सिलच्या या मेहनती कर्मचाऱ्याने दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत काम केले. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रहस्यमय परिस्थितीत गुमी सिटी कौन्सिलचा सरकारी कर्मचारी असलेल्या रोबोटचे काही भाग पायऱ्यांवर विखुरलेले आढळले. इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांवर हा रोबोट सापडला.

पहा पोस्ट- 

कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणारा हा देशातील पहिला रोबोट होता. हा रोबोट लोकांच्या खूप जवळ होता आणि इतर कर्मचाऱ्यांचा खूप आवडता होता. या रोबोमुळे लोकांना खूप मदत झाली होती. या यंत्राला 'रोबोट पर्यवेक्षक' म्हणूनही ओळखले जात असे. हा रोबोट विविध प्रकारची सरकारी कागदपत्रे स्थानिक रहिवाशांपर्यंत पोहोचवायचा आणि लोकांना माहिती पुरवायचा. अधिका-यांनी या घटनेबद्दल सांगितले की, दोन मीटर उंच पायऱ्यांवरून खाली पडल्यानंतर रोबोट निष्क्रिय झाला. (हेही वाचा: Gaganyaan Mission: भारताच्या पहिल्या अंतराळातील मानवी मोहिमेदरम्यान PM Narendra Modi जाणार अवकाशात? जाणून घ्या काय म्हणाले ISRO अध्यक्ष एस सोमनाथ)

तपास पथकाने हे तुकडे गोळा केले असून त्यांचे विश्लेषण केले जाईल. रोबोटच्या आत्महत्येची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांची निराशा झाली. कष्टकरी कर्मचाऱ्याने असे का केले, असा सवाल लोक विचारू लागले. त्याला फार कठीण काम देण्यात आले होते का? असा प्रश्नही विचारला जात आहे. कॅलिफोर्नियाच्या रोबोट-वेटर स्टार्टअप बेअर रोबोटिक्सने हा रोबोट तयार केला होता.या रोबोकडे नागरी सेवा अधिकाऱ्याचे कार्ड होते.