PhonePe वरुन मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मोजावे लागणार Extra Charges

यापुढे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा फोन रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहे.

PhonePe (Photo Credits-Twitter)

डिजिटल पेमेंट अॅप फोनपे (PhonePe) आता प्रत्येक व्यवहारासाठी प्रोसेसिंग फी (Processing Fee) आकारणार आहे. यापुढे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा फोन रिचार्ज (Phone Recharge) करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहे. 50 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाईल रिचार्जसाठी (Mobile Recharge) 1 ते 2 रुपये शुल्क आकारणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (PhonePe युजर्ससाठी खुशखबर! पेमेंट करण्यासोबत 'या' सर्विसचा लाभ घेता येणार)

"आम्ही एक अतिशय लहान प्रमाणात प्रयोग करत आहोत जेथे काही युजर्स मोबाईल रिचार्जसाठी पैसे देत आहेत. 50 रुपयांखालील रिचार्जसाठी शुल्क आकारले जात नाही. 50 ते 100 रुपयांच्या दरम्यानचे रिचार्जसाठी 1 रुपया आणि 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जसाठी 2 रुपये शुल्क आकारले जात आहे. बहुतेक युजर्स एकतर काहीही शुल्क देत ​​नाहीत किंवा 1 रुपये देतात," असे फोनपे प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले.

PhonePe यूपीआय-आधारित व्यवहारासाठी 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे शुल्क आकारत आहे. तुम्ही 50 रुपयांपर्यंत खर्च न केल्यास, डिजिटल अॅपद्वारे तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इतर पेमेंट अॅप्स प्रमाणे, फोनपे क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी प्रोसेसिंग फी आकारणे देखील सुरू करेल. PhonePe हे Paytm आणि Google Pay सोबत भारतातील सर्वात लोकप्रिय, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पेमेंट अॅप आहे. सप्टेंबरमध्ये त्याच्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटींपेक्षा जास्त UPI व्यवहार नोंदवले गेले आहेत आणि अॅप सेगमेंटमध्ये फोनपेचा 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे, असे पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे.

"आम्ही फी आकारणारे एकमेव पेमेंट प्लॅटफॉर्म नाही. बिल पेमेंटवर थोडे शुल्क आकारणे ही एक उद्योग पद्धत आहे. इतर बिलर वेबसाईट आणि पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे देखील असे शुल्क आकारले जातात. आम्ही फक्त क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर प्रक्रिया शुल्क आकारतो," असे प्रवक्त्याने पुढे सांगितले.

पेटीएम आणि गुगल पे प्रमाणेच फोनपेचा वापर भीम यूपीआय सह पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, अनेक बँक खाती व्यवस्थापित करण्यासाठी, खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी केला जातो. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि यासारख्या 140 हून अधिक बँकांचे खातेदार फोनपे चा वापर करतात.

Jio, Vodafone, Idea, Airtel इत्यादी प्रीपेड मोबाईल नंबर रिचार्ज, टाटा स्काय, एअरटेल डायरेक्ट, सन डायरेक्ट, व्हिडिओकॉन इत्यादी DTH रिचार्ज, विविध बिल भरणे तुम्ही फोनपे द्वारे करू शकता. तुम्ही PhonePe वापरून विमा पॉलिसी खरेदी किंवा पॉलिसीचे नूतनीकरण देखील करू शकता.