TIME Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत Jio Platforms आणि BYJU ची वर्णी

TIME Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत Jio Platforms आणि BYJU या भारतीय कंपन्यांची वर्णी लागली आहे.

Reliance Jio (Photo Credits: Twitter)

नवनव्या योजनांनी ग्राहकांना खुश करणाऱ्या जिओ (Jio) कंपनीचा टाईम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत समावेश झाला आहे. टाईम मॅगझिनने (TIME Magazine) दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीने गेल्या काही वर्षामध्ये संपूर्ण भारतभर सर्वात मोठे 4 जी नेटवर्क उभे केले आहे. हे करताना जगातील सर्वात कमी डेटा रेट्स सांभाळण्यातही ते यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर  BYJU या भारतीय कंपनीची देखील या यादीत वर्णी लागली आहे.

आता मोठमोठे गुंतवणूकदार जिओ प्लॅटफॉमकडे आकर्षित होत आहेत. रिलायन्स डिजिटल बिझनेस कंपनीचे 41 कोटी सब्सक्रायबर होणार आहेत. गेल्या वर्षी जिओने 20 बिलियन डॉलरचं कॅपिटल उभे केले होते. जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी टाईमने प्रथमच काढली आहे. या कंपन्या जगामध्ये प्रभावशाली बदल घडवून आणतात. हेल्थ केअर, मनोरंजन, वाहतूक, टेक्नॉलॉजी आणि इतर ग्लोबल नेटवर्क सेक्टर्समधील विविध कंपन्यांचा यात समावेश आहे.

जिओ सोबतच ed-tech कंपनी BYJU ने देखील या यादीत क्रमांक पटकावला आहे. कोविड-19 संकटकाळात BYJU चा अॅप ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर झाला असून कंपनीने सुमारे 8 कोटींचा नफा केला आहे. BYJU  या कंपनीला Tencent आणि BlackRock या मोठ्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळाली आहे.

WhiteHat Jr हा अॅप लहान मुलांना कोडिंग शिकवतो. या अॅपसोबत टायअप करुन BYJU या कंपनीने भारतात या अॅपचा प्रचार केला. त्यामुळे कंपनीला अमेरिकेतील e-learning मार्केटमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. यानंतर युएस, युके, इंडोनेशिया, मेक्सिको आणि ब्राझील या देशांमध्ये आपला व्यवसायाचा विस्तार करण्याची घोषणा BYJU कंपनीने एप्रिल महिन्यात केली. मुलांना परीक्षेसाठी तयार करणारं BYJU हे नंबर वन अॅप बनलं आहे. यामुळे BYJU ने जुलै 2019 मध्ये 5.5 बिलियन्सची कमाई केली आहे.