Highest Internet Speed: इंटरनेट गतीबाबत जपानने नोंदवला विश्वविक्रम; मिळवले तब्बल 319 Tbps स्पीड
बाजारात 4 जी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या अनेक कंपन्या असूनही, अनेकवेळा बर्याच ठिकाणी इन्टरनेटच्या स्पीडची (Internet Speed) समस्या निर्माण होते.
सध्याच्या काळात इंटरनेट (Internet) हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. बाजारात 4 जी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या अनेक कंपन्या असूनही, अनेकवेळा बर्याच ठिकाणी इन्टरनेटच्या स्पीडची (Internet Speed) समस्या निर्माण होते. कंपन्या त्यांच्या इंटरनेटचा स्पीड वाढवण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून त्याचा वेग काही प्रमाणात वाढविण्यात आला आहे. आता जपानने (Japan) या संदर्भात एक नवीन चाचणी केली आहे. जिथे एक एचडी व्हिडिओ किंवा चित्रपट डाउनलोड करण्यासाठी तासन तास लागतात, तिथे जपानच्या अभियंत्यांनी 319 Tbps चा स्पीड प्राप्त केले आहे.
हे स्पीड आतापर्यंतचे जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आहे. अशाप्रकारे जपानच्या अभियंत्यांनी 319 Tbps स्पीडद्वारे नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे. केवळ 1 वर्षातच या अभियंत्यांनी पूर्वीचे रेकॉर्ड तोडून डबल स्पीड इंटरनेट मिळवले आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या प्रयोगशाळेत टेस्टिंग दरम्यान इंटरनेटची गती 319 टेराबाईट्सवर आली आहे. मागील वर्षी अशाच एका चाचणीत हा वेग 178 टेराबाईट आला होता.
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमेरिकेची अंतराळ संस्था नासा देखील प्रति सेकंद 440 गीगाबाईटचा इंटरनेट स्पीड वापरते. आपण या स्पीडचा अंदाज यावरून लावू शकता की, या स्पीडद्वारे एका सेकंदात हजारो चित्रपट डाउनलोड केले जाऊ शकतात. जपानच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या या चाचणीचा अहवाल गेल्या महिन्यात ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला होता. (हेही वाचा: आता मानवी घामामधून होणार विजेची निर्मिती; संशोधकांनी सादर केली New Technology, जाणून घ्या सविस्तर (Watch Video))
संशोधकांचा असा दावा आहे की आपण 319 TB च्या स्पीडने केवळ 1 सेकंदामध्ये 57000 चित्रपट डाउनलोड करू शकतो. तसेच आपण स्पॉटिफायची संपूर्ण लायब्ररी 3 सेकंदात डाउनलोड करू शकतो. यासाठी एनआयआयसीटीने 3001 किमी लांबीचे ट्रान्समिशन तयार केले होते.