गुगल ने लॉन्च केली Coronavirus शैक्षणिक वेबसाईट; COVID-19 बद्दल सेफ्टी टिप्स, प्रतिबंधात्मक उपायांसह मिळणार महत्त्वपूर्ण माहिती
या वेबसाईटवर कोरोनाव्हायरस संबंधित सुरक्षितता कशी बाळगावी तसंच इतर अधिक माहिती देण्यात आले आहे.
लोकप्रिय सर्च इंजिन गुगल (Google) ने शनिवारी कोरोनाव्हायरस शैक्षणिक वेबसाईट (Coronavirus Educational website) लॉन्च केली आहे. या वेबसाईटवर कोरोनाव्हायरस संबंधित सुरक्षितता कशी बाळगावी तसंच इतर अधिक माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुगल कोरोना व्हायरससाठी एक स्क्रिनिंग वेबसाईट निर्माण करत असल्याचे सांगितले होते. ती वेबसाईट आता लॉन्च करण्यात आली आहे. google.com/covid19 अशी ही वेबसाईट असून यात कोरोना व्हायरस संबंधित शिक्षण, खबरदारी आणि स्थानिक संसाधने याची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये युजर्संना राज्य-आधारित सूचना, सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय, COVID-19 चे सर्च ट्रेंड्स इत्यादी माहिती मिळेल.
येत्या काही दिवसात ही वेबसाईट विविध भाषांमध्ये आणि देशांमध्ये लॉन्च करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसंच नवी माहिती उपलब्ध होताच वेबसाईट अपडेट करण्यात येईल. तसंच या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीमुळे लोकांच्या शंकेचे निरसन होऊन त्यांची नक्कीच मदत होईल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. (बिल गेट्स यांच्या 'गेट्स फाउंडेशन'कडून जगभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 कोटी डॉलर ची आर्थिक मदत जाहीर)
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून याचे युरोप, इटली, स्पेन, जर्मनी या देशात कोरोनाचे भयंकर रुप पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने जगात एकूण 11000 लोकांचा बळी घेतला असून 2,35,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे.