Fake Account ला आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! तक्रारीनंतर 24 तासांत फेक अकाऊंट होणार बंद
फेक अकाऊंटबाबत तक्रार आल्यास ट्विटर, फेसबुक, इस्टाग्राम आणि युट्युब सारख्या सोशल मीडिया कंपन्यांना ते अकाऊंट तक्रारीनंतर 24 तासांच्या आत हटवावे लागेल, असे सरकारने म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील फेक अकाऊंट (Fake Account) बाबत सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फेक अकाऊंटबाबत तक्रार आल्यास ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), इस्टाग्राम (Instagram) आणि युट्युब (Youtube) सारख्या सोशल मीडिया कंपन्यांना ते अकाऊंट तक्रारीनंतर 24 तासांच्या आत हटवावे लागेल, असे सरकारने म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अनेकदा सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो वापरुन फेक अकाऊंट तयार केले जाते. अशावेळी संबंधित व्यक्ती किंवा अगदी कोणत्याही सामान्य व्यक्तीकडून फेक अकाऊंट बाबत तक्रार आल्यास ते 24 तासांच्या आत हटवणे अनिवार्य असणार आहे. या नियमाचा नव्या आयटी नियमांत अंतर्भाव करण्यात आला आहे.
अभिनेता, खेळाडू, राजकारणी किंवा कोणत्याही सामान्य व्यक्तीने आपला फोटो दुसऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्याबद्दल तक्रार नोंदवल्यास कंपनीला ते अकाऊंट बंद करावे लागेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. अनेकदा फॉलोअर्स वाढवणं, संबंधित व्यक्तीवर निशाणा साधणं किंवा बेकायदेशीर कृत्य यासाठी सेलिब्रेटी किंवा अन्य प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने अकाऊंट ओपन करण्यामागे उद्देश असू शकतो. (Fake Accounts वर बंदी घालणे आवश्यक; भारत सरकारची Twitter ला सूचना)
पुढील काही दिवसांत माहिती तंत्रज्ञान FAQ जारी करेल, हे प्रश्न नव्या नियमांशी संबंधित असतील. तसंच सोशल मीडिया युजर्संना याचा कसा फायदा हेईल आणि फेक अकाऊंट बाबत इतर संभाव्य उपायांचा यात समावेश असेल.
सोशल मीडियावर बनवल्या जाणाऱ्या फेक अकाऊंटमध्ये बहुतेक वेळा त्या प्रसिद्ध व्यक्तीचा खरा फोटो किंवा एडिट केलेला फोटो वापरला जातो. त्यासोबतच त्या व्यक्तीच्या खऱ्या अकाऊंटमधील हुबेहुब माहिती या फेक अकाऊंटमध्ये दाखवली जाते जेणेकरून युजर्स संभ्रमात पडतील. या फेक अकाऊंटमुळे आतापर्यंत कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान झाले असून कित्येक वेळा यांचा वापर गुन्हेगारीसाठी केला जातो. काही कॉर्पोरेट फेक अकाऊंटमधून फिशिंग अॅटक, खोटे प्रॉ़डक्ट्स विकणे आणि स्कॅम चालवणे अशी अवैध कामे केली जातात.