Digital Detox: संध्याकाळी सायरन वाजताच बंद होतात सर्व फोन्स, टीव्ही व गॅझेट्स; डिजिटल जगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गावाचा अनोखा उपक्रम
मोहित्यांचे वडगाव नावाच्या या गावात साधारण 3,105 लोक राहतात. रविवारीही हा दिनक्रम पाळला जातो. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभागनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे.
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. या युगात जवळजवळ सर्व लोक मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर करत आहेत. डिजिटल क्रांतीने लोकांच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणले आहेत. ऑफिसपासून बँकेपर्यंतची कामे काही क्षणांत घरी बसून उरकली जातात. सध्या बहुतांश लोक मोबाईल आणि टीव्हीवर वेळ घालवतात, ज्यामुळे अनेक तोटेही होतात. पण डिजिटल जगात महाराष्ट्रात असे एक गाव आहे, जिथे लोक संध्याकाळी मोबाईल आणि टेलिव्हिजन पूर्णतः बंद करतात. या गावात संध्याकाळी ‘डिजिटल डिटॉक्स’ (Digital Detox) पाळला जातो.
सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव (Mohityanche Vadagaon) या गावात दररोज संध्याकाळी मंदिरात सायरन वाजतो. त्यानंतर गावातील सर्व लोक त्यांचे मोबाईल, टीव्ही आणि सर्व गॅजेट्स बंद करतात. सायरन वाजल्यानंतर, शाळेतील मुले त्यांच्या अभ्यास करतात, तर इतर लोक एकमेकांशी गप्पा मारतात किंवा पुस्तके वाचतात. डिजिटल जगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गावाने हा एक अनोखा मार्ग शोधला आहे.
या गावातील लोक दीड तास आपले मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅझेट बंद करतात. मोहित्यांचे वडगाव नावाच्या या गावात साधारण 3,105 लोक राहतात. रविवारीही हा दिनक्रम पाळला जातो. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभागनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे. गावचे सरपंच विजय मोहित यांनी मोबाईल व टीव्ही बंद करण्याचा प्रस्ताव मांडला होता. (हेही वाचा: ठाकरे सरकारने सुरु केलेली 'शिवभोजन थाळी' योजना बंद होण्याची शक्यता; शिंदे-फडणवीस सरकार घेणार आढावा)
सध्या फोन्स किंवा तत्सम गॅझेट्सचे दुष्परिणाम पाहता या विशेष मोहिमेत गावातील लोकही मोठ्या संख्येने सामील झाले. दरम्यान, मोहिते वडगाव हे 15 क्रांतिकारकांचे गाव. स्वातंत्र्यलढ्यात या गावातील लोकांनी मोठे काम केले आहे. गावातील 130 मुले प्राथमिक शाळेत तर 450 मुले माध्यमिक शाळेत शिकत आहेत. अशात या मुलांच्या भवितव्याचा विचार करून गावाने ‘डिजिटल डिटॉक्स’ नियम पाळण्याचा निर्णय घेतला.