Amazon Layoffs: ई-कॉमर्स जायंट ॲमेझॉनमध्ये 2025 पर्यंत होऊ शकते 14,000 मॅनेजर्सची कपात; कंपनीचे दरवर्षी 3 अब्ज डॉलर्सच्या बचतीचे लक्ष्य
2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कंपनीकडे जागतिक स्तरावर अंदाजे 1,05,770 व्यवस्थापक होते. 2025 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत व्यवस्थापकीय भूमिका 91,936 पर्यंत कमी होतील.
Amazon Layoffs: नुकतीच बातमी आली होती की, टेक इंडस्ट्रीमध्ये नोकरकपात (Job Cuts) सुरूच असून, 2024 मध्ये 451 कंपन्यांनी सुमारे 1,39,206 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. आता माहिती मिळत आहे की, ॲमेझॉन (Amazon) वार्षिक $3 अब्ज वाचवण्यासाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला 14,000 व्यवस्थापक पदे कमी करू शकते. मॉर्गन स्टॅन्लेच्या एका नोटचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. ॲमेझॉनने गेल्या काही वर्षांत अनेक व्यवस्थापकांना नियुक्त केले आहे. आता असे दिसते की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही फेरबदल करणार आहे.
अलीकडे, ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी म्हणाले की, कंपनीने पुनर्रचनेचा भाग म्हणून मार्च 2025 पर्यंत व्यवस्थापकांना वैयक्तिक योगदानकर्त्यांचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.’ आता मॉर्गन स्टॅन्लेच्या नोटमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या पुनर्रचना उपायामुळे 2025 च्या सुरूवातीस सुमारे 13,834 व्यवस्थापक नोकऱ्या कमी केल्या जातील, ज्यामुळे $2.1 अब्ज ते $3.6 अब्जची बचत होईल.
नोंदीनुसार, ॲमेझॉनच्या एकूण वर्कफोर्समध्ये मॅनेजर्स भूमिकांचा वाटा जवळपास 7 टक्के आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कंपनीकडे जागतिक स्तरावर अंदाजे 1,05,770 व्यवस्थापक होते. 2025 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत व्यवस्थापकीय भूमिका 91,936 पर्यंत कमी होतील. मीडिया रिपोर्ट्समध्ये उद्धृत केलेल्या मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषणानुसार, प्रति व्यवस्थापक अंदाजे खर्च $200,000 ते $350,000 प्रति वर्ष आहे. या अंदाजांच्या आधारे, 13,834 व्यवस्थापक नोकऱ्या कमी केल्यानंतर 2025 मध्ये ॲमेझॉन अंदाजे $2.1 अब्ज ते $3.6 अब्ज वाचवेल. (हेही वाचा: Amazon Return to Office Rule: Amazon चे कर्मचारी 5 दिवस कार्यालयात परतण्याच्या नियमामुळे संतापले, 73% कर्मचारी सोडणार जॉब)
ही बचत पुढील वर्षी कंपनीच्या अंदाजित ऑपरेटिंग नफ्याच्या सुमारे 3 ते 5 टक्के असेल. मॉर्गन स्टॅनलीच्या मते, हे पाऊल ॲमेझॉनसाठी फायदेशीर ठरेल. दरम्यान, ॲमेझॉनचे एकूण 1.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी आहेत. यातील बहुतांश कर्मचारी लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस ऑपरेशनमध्ये गुंतलेले आहेत. मात्र, ॲमेझॉनने नोकऱ्यांचा तपशील दिलेला नाही. यासह ॲमेझॉनचे सीईओ जॅसी यांनी पुढील वर्षी जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यालयात परत आणण्याचा कंपनीचा निर्णय उघड केला आहे.