AI Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे निर्माण होतील मोठ्या प्रमाणात नोकऱ्या; 46 टक्के कंपन्या देत आहेत एआयचे ट्रेनिंग
ते म्हणाले, 'माझा ठाम विश्वास आहे की, एआय लोकांना कामापासून वंचित ठेवण्यापेक्षा अधिक रोजगार निर्माण करेल.'
AI Jobs: जगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या प्रसारामुळे, लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे. असे मानले जाते की एआय मुळे जगभरातील मोठ-मोठ्या कंपन्यांमधील अनेक लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात. मात्र काही तज्ञ लोकांची उलट मते आहेत. आयबीएम इंडिया/दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल यांनी म्हटले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या कमी करेल मात्र त्यापेक्षा जास्त रोजगार निर्माण करेल.
आयएएनएसशी बोलताना पटेल म्हणाले की, त्यांनी तंत्रज्ञान आणि अनेक नवनवीन गोष्टी विकसित होत असल्याचे पाहिले आहे. ते म्हणाले, 'माझा ठाम विश्वास आहे की, एआय लोकांना कामापासून वंचित ठेवण्यापेक्षा अधिक रोजगार निर्माण करेल. जेव्हा पूर्णपणे नवीन नोकऱ्या बाजारात येतात तेव्हा लोक खूप घाबरतात. उदाहरणार्थ, इंटरनेटच्या आगमनामुळे वृत्तपत्र छपाईसारख्या काही क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट झाली, परंतु त्यामुळे वेब डिझाइन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि वेब प्रकाशनात लाखो नवीन नोकऱ्यांची निर्मिती झाली. त्यामुळे असे म्हणता येईल की एआय कौशल्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतील.
पटेल पुढे म्हणाले, 'भारतातील 46 टक्के कंपन्या सध्या कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन आणि एआय टूल्ससह जवळून काम करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत, परंतु अजूनही या क्षेत्रात बरेच काही करण्यास वाव आहे. आमच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांबाबत बोलायचे तर, 50 टक्के लोक नवीन एआय आणि ऑटोमेशन टूल्ससह काम करण्यास उत्सुक आहेत. जस-जशी ही तंत्रज्ञाने विकसित होत आहेत, तस-तसे तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायला शिकावे लागेल.'
आयटी आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या मते, एआय धील भारताच्या प्रगतीची गुरुकिल्ली ही तांत्रिक प्रतिभा आहे, चिप-चालित संगणकीय शक्ती नाही. ते गेल्या डिसेंबरमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले, 'एआय मधील टॅलेंट हे खूप मूलभूत आव्हान आहे. एआयमध्ये मास्टर्स आणि पीएचडी करण्यासाठी आम्हाला विद्यापीठांची गरज आहे. तंत्रज्ञान उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एआय संबंधित नोकऱ्यांसाठी भविष्यातील प्रतिभेची पाइपलाइन तयार करण्यासाठी जागतिक स्तरावर सरकारसोबत एकत्र काम करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.