IPL 2023: आयपीएलमधील पहिला सामना होणार चेन्नई आणि गुजरातमध्ये, जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड ?
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण दोन सामने झाले आहेत. दोन्ही सामने आयपीएल 2022 मध्ये खेळले गेले.
IPL 2023 उद्या म्हणजेच 31 मार्च, शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यावेळी स्पर्धेचा 16वा मोसम खेळला जाणार आहे. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) बाजी मारली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने पहिल्या सत्रात चमकदार कामगिरी केली. आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण दोन सामने झाले आहेत. दोन्ही सामने आयपीएल 2022 मध्ये खेळले गेले. या दोन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा 3 गडी राखून पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात गुजरातने 7 गडी राखून विजय मिळवला.
दोघांमधील पहिला सामना पुण्यात आणि दुसरा सामना मुंबईत झाला. पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा फलंदाज डेव्हिड मिलरने धावांचा पाठलाग करताना 51 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 94* धावांची धडाकेबाज खेळी केली. या शानदार खेळीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. हेही वाचा IPL 2023 Opening Ceremony: आयपीएल च्या ओपनिंग सेरेमनीला होणार ड्रोन लाईट शो; पहा झलक
मुंबईत CSK विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने 57 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 67 धावा केल्या आणि 134 धावांचा पाठलाग करताना 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.विशेष म्हणजे, 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला जाणारा सामना जिंकून गुजरात टायटन्स CSK विरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करू शकतो. आता या वेळी कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.