Rohit Sharma Birthday: जाणून घ्या हिटमॅन रोहित शर्माच्या कारकिर्दीमधील काही महत्वाचे विक्रम

त्याने क्रिकेट जगतात केलेले रेकॉर्ड या गोष्टीची साक्ष देतात. मुंबईकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रोहितने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले

Happy Birthday Rohit Sharma (Photo Credits: Facebook)

भारतीय क्रिकेट संघातील सलामी फलंदाज आणि क्रिकेट जगतात 'हिटमॅन' या नावाने लोकप्रिय असणारा क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रोहितचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा आणि आईचे नाव पूर्णिमा शर्मा आहे. रोहितला क्रिकेट जगतात भारतातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने क्रिकेट जगतात केलेले रेकॉर्ड या गोष्टीची साक्ष देतात. मुंबईकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रोहितने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या चालू असलेल्या आयपीएल (IPL) मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. आज रोहितच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या नावावर असणाऱ्या काही विक्रमांबद्दल

> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा असा एकमेव फलंदाज आहे, ज्याने एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके केली आहेत.

> वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक, सात वेळा 150+ स्कोअर बनवण्याचा रेकॉर्डही रोहित शर्माच्याच नावावर आहे.

> वनडे सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रमही रोहितच्याच नावावर आहे. रोहितने 2013 मध्ये बंगलोरविरुद्ध 209 धावा काढल्या होत्या, त्यात 16 षटकार होते.

> एकदिवसीय सामन्यात एका डावात 33 चौकार मारण्याचा विश्वविक्रम, रोहितने 2014 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 264 धावांच्या खेळीदरम्यान केला.

> कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये तीन जेतेपदे जिंकणारा रोहित हा पहिलाच कर्णधार आहे,  त्यानंतर धोनीने ही कामगिरी करून दाखवली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते.

> वनडेमध्ये 21 शतके पूर्ण करणारा रोहित शर्मा हा चौथा खेळाडू आहे.

> टी-20 मध्ये डेव्हिड मिलरच्या बरोबरीने सर्वात जलद शतक रोहितने केले आहे. 2017 साली इंदोर येथे श्रीलंकेविरुद्ध रोहितने 35 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या होत्या.

> रोहित शर्माने विराट कोहलीसोबत एकदिवसीय सामन्यात 4 वेळा 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. (हेही वाचा: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला दंडाची शिक्षा)

> एकदिवसीय सामन्यात 200 षटकार मारणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू आहे.

> पहिल्याच टेस्ट सिरीजमध्ये ‘मॅन ऑफ द सिरीज’ किताब जिंकणारा तो चौथा खेळाडू ठरला.

रोहित शर्माला 2015 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये श्रीलंकाविरुद्धात 264 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर असलेल्या विविध विक्रमांमुळे त्याला हिटमॅन म्हणून संबोधले जाते. आज रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्स संघाने आजचा दिवस 'हिटमॅन दिवस' म्हणून घोषित केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif