Yogasana: 'योगासन'ला Competitive Sport म्हणून मान्यता, खेलो इंडियामध्ये होणार समाविष्ट; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
क्रीडा मंत्रालयाने ही औपचारिक मान्यता दिल्याने, योगाला सरकारचे सहकार्य मिळणार आहे.
आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. गुरुवारी भारत सरकारने योगासनला (Yogasana) एक स्पर्धात्मक खेळ (Competitive Sport) म्हणून मान्यता दिली. इतर खेळांप्रमाणेच योगासाठी राज्यांमध्ये योग स्पोर्ट्स फेडरेशन असेल व आता योगाचे स्पर्धात्मक खेळ आयोजित केले जातील. क्रीडा मंत्रालयाने ही औपचारिक मान्यता दिल्याने, योगाला सरकारचे सहकार्य मिळणार आहे. क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि आयुष (आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी योगासनला एका कार्यक्रमादरम्यान स्पर्धात्मक खेळ म्हणून मान्यता दिली. आता लोक इतर खेळांप्रमाणे योगामध्ये करिअर करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक रस दाखवतील.
रिजिजू म्हणाले, 'योगासन हा बऱ्याच काळापासून स्पर्धात्मक खेळ आहे. परंतु भारत सरकारकडून याला मान्यता प्राप्त होणे आवश्यक होते, जेणेकरून हा अधिकृत आणि मान्यताप्राप्त स्पर्धात्मक खेळ बनू शकेल. आता याच पार्श्वभूमीवर आज मोठा दिवस आहे आणि आम्ही स्पर्धात्मक खेळ म्हणून औपचारिकरित्या योगाला मान्यता देत आहोत.’ गेल्या वर्षी योग गुरु बाबा रामदेव यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योगा स्पोर्ट्स फेडरेशनचीही स्थापना करण्यात आली होती. डॉ. एचआर नागेंद्र हे त्याचे सरचिटणीस आहेत. (हेही वाचा: ब्रेकडान्सिंगला मिळाला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा; 2024 च्या पॅरिस खेळांमध्ये होणार समाविष्ट)
मंत्री किरण रिजिजू पुढे म्हणाले की, योगसनला स्पर्धात्मक खेळ म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयामुळे फिट इंडिया चळवळीलाही चालना मिळेल. यामुळे याची लोकप्रियता भारतात वाढेल आणि खेलो इंडिया स्कूल आणि युनिव्हर्सिटी प्रोग्राममध्येही त्याचा समावेश होईल. दरम्यान, या स्पर्धेसाठी चार खेळ आणि सात गटात 51 पदके प्रस्तावित आहेत. यामध्ये योगासन, कलात्मक योग (एकेरी आणि दुहेरी), तालबद्ध योग (एकेरी, गट), वैयक्तिक अष्टपैलू चँपियनशिप आणि कार्यसंघ यांचा समावेश आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्यक्तिगत योगासन क्रीडा स्पर्धादेखील प्रस्तावित आहे.