Badminton World Championship: वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या सेमीफायनलमध्ये होऊ शकते सायना नेहवाल, पी व्ही सिंधू यांच्यात लढत
सायना आणि सिंधूने प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार करत उपांत्य फेरीत मजल मारली तर भारताच्या या दोन अव्वल खेळाडूंमध्येच सेमीफायनलची लढत रंगणार आहे.
भारतीय बॅडमिंटनचे स्टार खेळाडू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पी व्ही सिंधू (PV Sindhu) पुढील आठवडय़ात स्वित्झर्लंडच्या बसेल (Basel) येथे रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकांच्या आमने-सामने येणार आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या वेळापत्रकात जागतिक बॅडमिंटन महासंघाने नुकताच बदल केल्यामुळे सायना आणि सिंधूचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. सायना आणि सिंधूने प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार करत उपांत्य फेरीत मजल मारली तर भारताच्या या दोन अव्वल खेळाडूंमध्येच सेमीफायनलची लढत रंगणार आहे. (Forbes List: महिला अॅथलीट्सची सर्वाधिक कमाई, पी व्ही सिंधू एकमेव भारतीय; नाओमी ओसाका हिची सेरेना विल्यम्स हिला टक्कर)
वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे, 'काही खेळाडूंना चुकून महिला एकेरीच्या वेळापत्रकात स्थान देण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर महिला एकेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.'वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणाऱ्या सिंधूला पाचवे मानांकन मिळाले आहे. पहिल्या राउंडमध्ये सिंधूला बाय देण्यात आले आहे. त्यानंतर तिचा सामना चायनीज तैपेईची पै यू पो किंवा बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरी यांच्यामधील विजेत्याशी होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीत सिंधूला अमेरिकेच्या बेईवेन झँग हिचे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, आठवे मानांकन प्राप्त सायनाला दुसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या सॅबरिना जॅकेट आणि नेदरलँड्सची सोराया डे विच इजबेरगेन यांच्यातील विजेतीशी सामना करावा लागेल. तर तिसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्या आव्हानाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.