Sagar Mali Passes Away: मुंबईचा 'ज्युनियर रॉनी कोलमन' सागर माळी चं वयाच्या 38 व्या वर्षी निधन
सागर माळी ने २०१४ मध्ये मुंबईत पार पडलेल्या 'मिस्टर वर्ल्ड' स्पर्धेत त्याने ८५ किलो वजनी गटात थेट चौथा क्रमांक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली होती.
मुंबईचा 'ज्युनियर रॉनी कोलमन' म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सागर माळी (Sagar Mali) याचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून तो मूत्रपिंडाच्या आजाराशी लढा देत होता, मात्र ही झुंज अपयशी ठरली. त्याच्या अचानक जाण्याने क्रीडा जगतात आणि विशेषतः मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
'मुंबई श्री' ते 'मिस्टर वर्ल्ड'पर्यंतचा प्रवास
पिळदार शरीरयष्टी, दणकट स्नायू आणि मंचावर उतरताच प्रेक्षकांना भुरळ घालणारा सागर माळी २०१३ मध्ये प्रतिष्ठेचा 'मुंबई श्री' किताब जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याची धिप्पाड शरीरयष्टी पाहून चाहत्यांना जागतिक कीर्तीच्या रॉनी कोलमनची आठवण येत असे, त्यामुळेच त्याला 'रॉनी' हे टोपणनाव मिळाले.
'मुंबई श्री'नंतर सागरने 'महाराष्ट्र श्री' आणि 'भारत श्री' स्पर्धांमध्येही आपल्या कामगिरीची छाप पाडली. २०१४ मध्ये मुंबईत पार पडलेल्या 'मिस्टर वर्ल्ड' स्पर्धेत त्याने ८५ किलो वजनी गटात थेट चौथा क्रमांक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली होती. २०२० मधील 'महाराष्ट्र श्री' स्पर्धेत सुनीत जाधवला त्याने दिलेली कडवी झुंज शरीरसौष्ठवप्रेमींच्या आजही स्मरणात आहे.
कोरोनानंतरचा ब्रेक आणि दुर्दैवी शेवट
२०१९ पर्यंत स्पर्धा गाजवणारा सागर कोरोना काळानंतर काही काळ स्टेजपासून दूर राहिला. मात्र ही विश्रांती कायमची ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून तो मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी सामना करत होता. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्याच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. वर्षानुवर्षे मेहनत करून शरीर कमावणाऱ्या या खेळाडूला दुर्दैवाने स्वतःच्याच शरीरातील अवयवाशी ही जीवघेणी लढाई लढावी लागली.
सागर माळीच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. त्याचे कुटुंबीय सध्या परदेशात असल्याने, त्यांच्या आगमनानंतर रविवारी मुंबईतील मुलुंड येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.