Pro Kabaddi 2019: बंगाल वॉरियर्सचा यू मुम्बा विरुद्ध 32-30 ने थरारक विजय, मागील तीन मोसमातील पहिला विजय

बंगालचा मुंबाविरुद्ध मागील तीन मोसमातील पहिला विजय आहे.

(Photo Credit: @ProKabaddi/Twitter)

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi) सातव्या सत्रात पटनाच्या लेगच्या शेवटच्या दिवशी 32 व्या सामन्यात बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) ने थरारक लढतीत यू मुम्बा (U-Mumba) ला 32-30 ने पराभूत केले. या विजयासह बंगालचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. बंगालचा मुंबाविरुद्ध मागील तीन मोसमातील पहिला विजय आहे. बंगाल वॉरियर्सचा मागील पाच सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे. यू-मुंबासाठी अर्जुन देशवाल (Arjun Deshwal) याने 10 गुण मिळवले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. बंगालच्या डिफेन्समध्ये बलदेवने पाच आणि जीवने 4 पॉईंट्स मिळवले.

पहिल्या हाल्फमध्ये यू मुम्बाचा 16-11 अश्या आघाडीवर होता. पहिल्या 20 मिनिटात यू मुंबाचा रायडर अर्जुन देशवालने सर्वाधिक 5 गुण केले. त्याच्याशिवाय सुरेंद्र सिंह याने डिफेन्समध्ये तीन गुण मिळवले. बंगाल वॉरियर्सकडून के. प्रपंजन, जीवन कुमार आणि बलदेव सिंह यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले. पहिल्या हाल्फच्या दहाव्या मिनिटाला बंगाल वॉरियर्स संघ ऑल-आऊट झाला. दुसर्‍या हाफच्या सुरूवातीस, बंगाल संघाने शानदार पुनरागमन केले आणि 22 व्या मिनिटाला यू मुम्बा ऑलआऊट केल्यानंतर 19-19 अशी बरोबरी साधली होती, पण यू मुम्बानेही नंतर चांगले पुनरागमन केले. देशवालच्या सुपर 10 च्या जोरावर 28 व्या मिनिटाला वॉरियर्सला पुन्हा ऑल-आऊट करत 6 गुणांची आघाडी मिळवली.

मात्र बंगाल वॉरियर्सने परत पुनरागमन केले आणि 36 व्या मिनिटाला यू मुम्बा अवघ्या एका गुणाने पुढे होता. 37 व्या मिनिटाला यू मुंबाला ऑल आऊट केले आणि 31-28 ने पुढे झाले. अखेरच्या रेडच्या अगोदर बंगाल एका गुणाने पुढे होता आणि देशवालच्या अयशस्वी रेडच्या जोरावर बंगालने विजय मिळविला. दरम्यान, यू मुंबाचा पुढील सामना 16 ऑगस्ट रोजी अहमदाबाद लेगमध्ये पटना पायरेट्स विरुद्ध होईल. तर वॉरियर्सचा पुढील सामना 12 ऑगस्ट रोजी अहमदाबादमध्ये तेलगू टायटन्स विरुद्ध होईल.