IPL Auction 2025 Live

Coronavirus: खुशखबर! इंग्लंडमध्ये बुधवारपासून सुरु होणार टेनिस कोर्ट, गोल्फ कोर्स, लोकांना घराच्या सदस्यांसहच खेळण्याची परवानगी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी सांगितले की, "लोक फक्त त्यांच्या घरातील सदस्यांसह खेळू शकतात".

टेनिस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

इंग्लंडमधील (England) टेनिस कोर्ट आणि गोल्फ कोर्स बुधवारपासून पुन्हा सुरू होऊ शकतात, परंतु लोकांना त्यांच्या घरातील सदस्यांसोबतच खेळण्याची परवानगी दिली जाईल अशी घोषणा ब्रिटिश सरकारने केली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात ब्रिटनमध्ये राष्ट्रीय पातळीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते आणि त्यानंतर क्रीडा स्पर्धाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आता समुद्रात किंवा तलावांमध्ये पोहण्यास परवानगी असली तरीही जिम आणि जलतरण तलाव अद्याप बंदच राहतील. स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड टेनिस कोर्ट आणि गोल्फ कोर्स सुरू करण्याबाबत आपली भूमिका ठरवू शकतात आणि लॉकडाउन काटेकोरपणे पाळले जाईल, असे त्यांच्या प्रशासनाने आधीच सूचित केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी रविवारी सांगितले की, "लोक फक्त त्यांच्या घरातील सदस्यांसह खेळू शकतात". प्रीमियर लीगसह व्यावसायिक खेळ कधी सुरु होऊ शकतात हे जॉन्सन यांनी सांगितले नाही. व्यावसायिक क्रीडा स्पर्धादेखील मार्चपासून रखडल्या आहेत. (Coronavirus Outbreak: जगभरात एकूण 40 लाख कोरोना बाधित तर 2 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू)

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच जात आहे. जगभरात संक्रमित लोकांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार 187 देश आणि प्रदेशात आतापर्यंत 40,59,369 लोकांना या व्हायसची लागण झाली आहे. यापैकी 2,77,973 लोकांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकामध्ये संक्रमित आणि मृत्यूच्या बाबतीत प्रथम स्थानावर आहे. तेथे 13,27,921 लोकांना कोरोनाची लागण झाली आहेत तर 78,849 लोक मरण पावले आहेत.

दुसरीकडे, युरोपमध्ये रुग्णांच्या यादीत स्पेन आणि मृत्यूमध्ये ब्रिटन अव्वल आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 2,62,783 लोकांना याची लागण झाली आहे आणि 26,478 जणांचा मृत्यू झाला आहे. यूकेमध्ये आतापर्यंत 2,15,260 लोकांना संसर्ग झाला असून 31,587 लोकांचा मृत्यू झाला आहे.