National Sports Awards 2021: ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रासह 12 खेळाडूंचा ‘या’ दिवशी होणार खेलरत्नने सन्मान; 35 खेळाडू बनले अर्जुन पुरस्कार विजेते

क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे की 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील.

नीरज चोप्रा (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) पदक विजेते नीरज चोप्रा (Neeraj Chopra), रवि कुमार दहिया आणि लोव्हलिना बोरगोहेन यांच्यासह एकूण 12 खेळाडूंचा प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने (Khel Ratna Award) सन्मानित होणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने  (Sports Ministry) मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 ची घोषणा केली. सुरुवातीला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने यापूर्वी भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान - मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 11 खेळाडूंची शिफारस केली होती. त्यानंतर आता भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहचाही (Manpreet Singh) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नीरज (अॅथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लोव्हलिना (बॉक्सिंग), श्रीजेश पीआर (हॉकी), अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), सुमित अंतील (पॅरा अॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नगर (पॅरा बॅडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), आणि मनप्रीत सिंग (हॉकी) यांच्यासह एकूण 12 खेळाडूंना प्रदान केला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मानाचे नामकरण महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर केले होते. चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो. खेलरत्न पुरस्कारासाठी 11 भारतीय खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती, तर अर्जुन पुरस्कारासाठी 35 भारतीय खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. यामध्ये भारतीय सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan), आणि भारतीय हॉकी संघाचा समावेश होता. याशिवाय क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे की 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील. “13 नोव्हेंबर 2021 (शनिवार) रोजी 16:30 वाजता राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेते भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार स्वीकारतील,” क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले.

दुसरीकडे, जीवनगौरव श्रेणीमध्ये, टी.पी. ओसेफ (अॅथलेटिक्स), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंह (हॉकी), आशा कुमार (कबड्डी) आणि तपन कुमार पाणिग्रही (जलतरण) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी एकूण 10 प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील अभूतपूर्व कामगिरी पाहता यंदा पुरस्कार विजेत्यांची संख्या जास्त असेल असे अपेक्षित होते. भारताने ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली आणि पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह 19 पदके मिळविली.