रोहितची उत्तुंग भरारी, तर अश्विनची टॉप १० मध्ये धडक
पहिल्या कसोटीमधील दमदार कामगिरीच्या जोरावर अश्विन आणि रोहितची अनुक्रमे गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्या क्रमवारीत बढती.
नुकत्याच जाहीर झालेल्या खेळाडूंच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात घेतलेल्या 8 बळींच्या जोरावर गोलंदाजांच्या यादीत (ICC TEST RANKINGS) पहिल्या दहात धडक मारली आहे. 2019 मधला वैयक्तिक पहिला सामना खेळणाऱ्या अश्विनने पहिल्या डावात 7 विकेट तर दुसऱ्या डावात एक विकेट पटकावली होती. तर दुसरीकडे पहिल्यांदाच सलामीला आलेल्या रोहित शर्माने 2 शतकांच्या बळावर 36 स्थानांची भरारी घेऊन 17 व्या स्थानी झेप घेतली आहे. (हेही वाचा. IND vs SA 1st Test Day 5: रविचंद्रन अश्विन याचा कमाल; मुथय्या मुरलीधरन ची बरोबरी करत बनवला सर्वात जलद 350 टेस्ट विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड)
दोन्ही खेळाडूंनी सामन्यात अनेक विक्रम मोडीत काढले. एका सामन्यात सर्वाधिक सिक्स मारण्याचा वासिम अक्रमचा विक्रम रोहितने 13 सिक्स मारून मोडला, तर 66 वा सामना खेळणाऱ्या अश्विनने कमीत कमी सामन्यात 350 विकेट्स घेण्याच्या मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबरी साधली.
गोलंदाजांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर पोचलेला अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही 5 व्या क्रमांकावर पोचला आहे. जडेजाने बांग्लादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकत 2 रा क्रमांक पटकावला आहे. स्टिव्ह स्मिथ , पॅट कमिन्स आणि जेसन होल्डर हे अनुक्रमे फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी आहेत.