IPL 2022 KKR vs RR: कोलकाता नाइट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव

कोलकाताकडून नितीश राणा (Nitish Rana) आणि रिंकू सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 153 धावांचे लक्ष्य दिले होते.

IPL 2022 KKR vs RR

आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 गडी राखून पराभव केला. कोलकाताकडून नितीश राणा (Nitish Rana) आणि रिंकू सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 153 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात कोलकाताने 19.1 षटकांत सामना जिंकला. यादरम्यान नितीशने नाबाद 48 धावा केल्या. तर रिंकू सिंगने नाबाद 42 धावा केल्या. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताकडून बाबा इंद्रजीत आणि आरोन फिंच सलामीला आले. इंद्रजीत 16 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. तर फिंच केवळ 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

कर्णधार श्रेयस अय्यरने 34 धावांची खेळी खेळली. त्याने 32 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. शेवटी नितीशने 37 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या.  त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर रिंकू सिंगने 23 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 25 धावा देऊन एक विकेट घेतली.

रविचंद्रन अश्विनने 4 षटकात 33 धावा दिल्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळाली नाही. प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकात 37 धावा देत एक विकेट घेतली. युजवेंद्र चहलने 4 षटकात 31 धावा दिल्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळाली नाही. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 152 धावा केल्या.  यादरम्यान संजू सॅमसनने अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. हेही वाचा IPL 2022 KKR vs RR: वाचा केकेआरकडून डेब्यू मॅच खेळणारा कोण आहे अनुकुल रॉय ?

शिमरॉन हेटमायरने अखेरपर्यंत शानदार फलंदाजी केली. त्याने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. हेटमायरने 2 षटकार आणि एक चौकार लगावला. रियान परागने 19 आणि जोस बटलरने 22 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून टीम साऊदीने 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 46 धावा दिल्या. उमेश यादवने 4 षटकात 24 धावा देत 1 बळी घेतला. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हर काढला. अनुकुल रॉय आणि शिवम मावी यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. सुनील नरेनला एकही यश मिळाले नाही.