ISSF World Cup 2019: ऑलिम्पिक समितीची भारतावर कारवाई; क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत घातली बंदी, वाचा काय आहे कारण
पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भविष्यात ऑलिम्पिक आणि कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे
पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त भारताने पाकिस्तानची चहुबाजूनी कोंडी करायला सुरुवात केली आहे. राजकारण, चित्रपट आणि आता क्रीडा विश्वातही भारत पाकिस्तानपासून अलिप्त राहायचा प्रयत्न करीत आहे. राजधानी दिल्लीत आजपासून नेमबाजी विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे, या स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजपटूंना (Pakistani shooters) व्हिसा नाकारला आहे. मात्र पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची भारताची ही खेळी भारतावरच उलटली आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee)ने भविष्यात ऑलिम्पिक आणि कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे.
भारताने दोन नेमबाजपटूंना व्हिसा नाकारल्यानंतर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयओसीच्या महत्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सोबत विश्वचषकात 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेसाठी देण्यात आलेला ऑलिम्पिक कोटाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काढून घेतला आहे. याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये, ‘भारताचे हे वागणे आयओसीच्या नियमांच्या विरोधात आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय यजमान देशाने खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वागत करायला हवे. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना, निःपक्षपातीपणे आणि समानतेच्या वातावरणात त्यांना खेळण्याची संधी मिळावी’ असे म्हटले आहे. (हेही वाचा: वर्ल्डकपमधून पाकिस्तान टीम बाहेर काढण्यास भारताचे प्रयत्न, BCCI ने लिहिले पत्र)
आता जोपर्यंत भारत या खेळाडूंना प्रवेश देण्याबाबत आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांचे पालन करण्याबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, तसेच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनालाही तोपर्यंत स्थगिती देण्यात येणार आहे असे आयओसीने सांगितले आहे. दरम्यान येऊ घातलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला परवानगी मिळू नये यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे, आणि जर सरकारने सांगितले तर आम्ही पाकिस्तानशी खेळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.