IND vs BAN 1st T20I: दिल्लीमध्ये मॅच होणार की नाही, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केले हे विधान 

दिल्ली-एनसीआरमध्ये खराब हवामानामुळे दोन्ही संघातील पहिला सामना दिल्लीच्या बाहेरच खेळवण्याची मागणी करण्यात येत होती, त्यावर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुलीने दुजोरा दिला आहे की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना नियोजितप्रमाणे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल.

सौरव गांगुली (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्लीला (Delhi) सध्या हवामानामुळे फटका बसला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये खराब हवामानामुळे दोन्ही संघातील पहिला सामना दिल्लीच्या बाहेरच खेळवण्याची मागणी करण्यात येत होती, त्यावर बीसीसीआयचे (BCCI) नवे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मोठे विधान केले आहे. गुरुवारी गांगुलीने दुजोरा दिला आहे की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना नियोजितप्रमाणे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल. हा सामना दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा बीसीसीआयचा कोणताही हेतू नाही. तीन ते साडेतीन तास दोन्ही संघ संध्याकाळी सात नंतर सहज खेळू शकतात. एअर क्वालिटी इंडेक्सच्या अहवालानुसार असे म्हटले होते की हरियाणा आणि पंजाबच्या आसपासच्या भागात दिवाळीत फटाके फोडण्यामुळे दिल्लीची हवा काळी झाली आहे. या वायू प्रदूषणामुळे खेळाडूंना मैदानात उतरताना अडचण येऊ शकते. (IND vs BAN 2019: भारत दौऱ्यासाठी नवीन बांग्लादेश संघ जाहीर; शाकिब अल हसन वर बंदीनंतर 'या' खेळाडूंना मिळाली टी-20 आणि टेस्ट कर्णधारपदाची जबाबदारी)

एएनआयच्या वृत्तानुसार, गांगुलीने गुरुवारी सांगितले की भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेचा पहिला सामना नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीमध्ये होईल. पर्यावरणवाद्यांनी असेही म्हटले होते की खेळाडूंच्या आरोग्यासही यामुळे त्रास असू शकतो, परंतु भारतीय क्रिकेट बोर्डाने ही परिस्थिती नाकारली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणार्‍या या मालिकेत 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. रविवारी (3 नोव्हेंबर) पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या दौर्‍यावर भारताचा पहिला डे-नाईट कसोटी सामनादेखील खेळला जाईल. कोलकातामध्ये खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना पिंक बॉल टेस्ट सामना असेल.

भारतीय टी-20 संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर.

भारतीय कसोटी संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल आणि रिषभ पंत.



संबंधित बातम्या