IPL Auction 2025 Live

India Vs Australia 2nd Test : विराटच्या विक्रमी शतकानंतरही भारतीय संघ 283 धावांवर बाद

कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी 123 धावांच्या शतकानंतरही भारतीय संघ 283 धावांचा पल्ला गाठू शकला

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: Getty Image)

India Vs Australia 2nd Test : पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी 123 धावांच्या शतकानंतरही पहिल्या इनिंगनंतर भारतीय संघ 283 धावांचा पल्ला गाठू शकला. यामुळे ऑस्ट्रेलियाने 43 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर 327 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून विराट कोहली 123, अजिंक्य रहाणे 51, ऋषभ पंत 36 आणि चेतेश्वर पुजाराने 24 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी थोडी निराशाजनक झाली. भारताने पहिल्या 8 धावांमध्ये दोन विकेट गमावल्या. अशावेळी कोहली आणि पुजाराने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. 123 धावा करुन कोहली कमिंसकरवी बाद झाला. तर नंतर शमीही शुन्य धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजाराही 103 बॉलमध्ये 24 रन्स केल्यानंतर मिेथेलच्या बॉलींगवर पेनकडे कॅच देत बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर संपला. भारताकडून इशांत शर्माने 4, बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियासाठी एरॉन फिंच (50), मार्कस हॅरिस (70) आणि ट्रॅविस हेड (58), शॉन मार्श (45), पेनने (38) धावा केल्या.

दरम्यान या सामन्यात विराट कोहली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने आपली 25 शतके पूर्ण करण्यासाठी 127 डाव खेळले. हा मैलाचा दगड गाठण्यासाठी सचिनला मात्र 130 डाव खेळावे लागले होते. हे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 वे तर ऑस्ट्रेलियातील 6 वे शतक ठरले आहे. तब्बल 26 वर्षांनंतर पर्थवर भारतीय फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले आहे.