भारत-ऑस्ट्रेलियाची 'ती' मॅच इशांत शर्माच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का; त्यानंतर 15 दिवस तो रडत होता

मात्र त्यावेळीच्या सामना भारत हरला होता आणि त्या सामन्यानंतर इशांत शर्मा तब्बल 15 दिवस रडत होता

इशांत शर्मा (Photo credit : youtube)

भारताचा, मैदानावरील आक्रमक खेळाडूंपैकी एक म्हणून इशांत शर्मा (Ishant Sharma) कडे पहिले जाते. भारताचा फास्ट बॉलर, भारताच्या कसोटी संघातील प्रमुख गोलंदाज अशी इशांत शर्माची ओळख आहे. मात्र आजही 2013 सालचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना आठवल्यावर इशांतच्या अंगावर काटा उभा राहतो. आज भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत एकदिवसीय मालिकेत 2-1 असे पराभूत केले. मात्र त्यावेळीच्या सामना भारत हरला होता आणि त्या सामन्यानंतर इशांत शर्मा तब्बल 15 दिवस रडत होता. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीमधील अनेक गोष्टींचे खुलासे इशांतने केले आहेत, यातील हा सामना आजही इशांतच्या डोळ्यासमोर आहे तसा तरळतो. इशांत कारकीर्दीमधील हा सर्वात मोठा आघात होता.

2013 साली भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 अशी बरोबरीत होती आणि मोहाली येथे तिसरा वन डे सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करत 303 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 18 बॉलमध्ये विजयासाठी 44 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाहून भारतच जिंकणार असल्याचे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. या मॅचची 48 वी ओव्हर टाकायला ईशांत शर्मा आला. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉकनर बॅटिंग करत होता. परंतु त्या षटकात इशांतने 4, 6, 6, 2, 6, 6 अशा तब्बल 30 धावा दिल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 गडी राखून जिंकला.

या घटनेनंतर ईशांत शर्मावर चौफेर टीका झाली होती, त्यामुळे इशांत शर्मा पूर्णतः कोसळून गेला होता. हा धक्का तो पचवूच शकला नाही. त्याला नैराश्य आले आणि पुढचे सलग 15 दिवस तो ढसाढसा रडत होता. त्यावेळी पत्नी प्रतिमा सिंह आणि मित्र राजीव महाजन यांनी त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी इशांतला मदत केली. त्यांनी त्याला समजावले म्हणूनच इशांत शर्मा पुन्हा क्रिकेटविश्वात पुनरागमन करू शकला.