Year-Ender 2020: 'या' 5 खेळाडूंनी 2020 मध्ये ठोकल्या सर्वाधिक टेस्ट धावा, टीम इंडियासाठी 'हा' फलंदाज ठरला नंबर-1
यंदा कोरोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्र प्रभावित झाले. आज या लेखाच्या माध्यमातून आपण अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दहामध्ये एकही भारतीय फलंदाजांचा नाही आहे.
Most Test Runs 2020: 2020 च्या अखेरीस आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत आणि काही तासांनंतर नवीन वर्ष सुरू होईल. यंदा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) क्रीडा क्षेत्र प्रभावित झाले. अनेक महिन्यांपर्यंत खेळ थांबवण्यात आले, मात्र जेव्हा खेळाडू पुन्हा मैदानावर उतरले तेव्हा ते जुन्या अंदाजातच दिसले. मार्च महिन्यात जगभरात कोरोनाच्या वाढत्या उद्रेकानंतर जवळपास सर्व खेळ थांबवण्यात आले होते. क्रिकेटमधील काही घरगुती टी-20 लीगपासून संघाचं आंतरराष्ट्रीय दौरेही रद्द किंवा पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले. ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणारे टी-20 वर्ल्ड कप देखील 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. अखेरीस जून महिन्यात वेस्ट इंडिजच्या इंग्लंड (England) दौऱ्याने आंतरराष्ट्रीय दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने देखील इंग्लंडचा दौरा केला. अशा स्थितीत आज या लेखाच्या माध्यमातून आपण अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. (Year Ender 2020: षटकारांचे बादशाह! यंदा ‘या’ खेळाडूंनी वनडेमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार, पाहा आकडा)
विशेष म्हणजे पहिल्या दहामध्ये एकही भारतीय फलंदाजांचा नाही आहे. इंग्लंडचा सध्याचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) यावर्षी आतापर्यंत सात कसोटी सामने खेळून 12 डावांमध्ये 58.27 च्या सरासरीने 641 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंडचा युवा फलंदाज डोम सिब्ली दुसरा फलंदाज आहे. सिब्लीने यंदा 6 कसोटी सामने खेळत 14 डावांमध्ये 47.30 च्या सरासरीने 615 धावा केल्या आहेत. या यादीतील इंग्लंडचा युवा फलंदाज जॅक क्रोली तिसऱ्या स्थानावर आहे. जॅकने 11 डावांच्या 5 कसोटी सामन्यात 52.72 च्या सरासरीने 580 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत 4 सामन्यांच्या 6 डावात 498 धावा करत चौथे स्थान पटकावले तर इंग्लंडचा जोस बटलरने 9 सामन्याच्या 14 डावात 497 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, टीम इंडियासाठी भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रहाणेने 4 सामने खेळत 7 डावात 245 धावा केल्या आहेत. रहाणेनंतर भारताचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने तितक्याच सामन्यात 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या रहाणेने मेलबर्न सामन्याच्या पहिल्या डावात 112 धावा केल्या आहेत.