World Test Championship 2021-23: भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजने सुरु होणार दुसऱ्या WTC स्पर्धेचा महासंग्राम, टीम इंडिया खेळणार इतक्या कसोटी मालिका
ESPNcricinfo चा हवाला देत ANI ने म्हटले की दुसर्या डब्ल्यूटीसी चक्रात या फक्त दोन दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
ICC WTC 2021-23: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (World Test Championship) दुसरे चक्र सुरु होणार आहे. 4 ऑगस्टपासून भारत आणि यजमान इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने येतील तर यंदा वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया (Australia) अॅशेस मालिकेत (Ashes Series) इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. ESPNcricinfo चा हवाला देत ANI ने म्हटले की दुसर्या डब्ल्यूटीसी चक्रात या फक्त दोन दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. अहवालानुसार ऑस्ट्रेलिया 2021 मध्ये चार कसोटी सामन्यांसाठी भारत दौर्यावर येईल. पण आयसीसीने (ICC) मालिकेचे वेळापत्रक आणि ठिकाण याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच गेल्या डब्ल्यूटीसी चक्रातील कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आलेले दौरे पुढे चालवल्या जाणार नाहीत. (Team India WTC 2021-23 Schedule: पुढील कसोटी चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक आऊट, ‘या’ 6 संघांशी भिडणार)
आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांनुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात प्रत्येकी तीन कसोटी मालिका खेळेल. टीम इंडिया या चक्रात एकूण 19 कसोटी सामन्यात खेळेल तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी 15 कसोटी सामने खेळतील. विशेष म्हणजे इंग्लंड दुसर्या डब्ल्यूटीसी चक्रातील कोणत्याही संघाकडून सर्वाधिक 21 कसोटींमध्ये भाग घेईल. आयसीसीने प्रत्येक कसोटीला समान गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. सामना टाय झाल्यास प्रत्येक संघाला सहा गुण दिले जातील तर अनिर्णित राहिल्यास चार गुण मिळतील. प्रत्येक सामन्यासाठी विजेत्या संघाला 12 गुण दिले जातील तर धीम्या रन रेटसाठी एक गुण वजा केला जाईल. “दोन कसोटी किंवा पाच कसोटी सामन्यांत खेळल्या जात असल्या तरी याची पर्वा न करता प्रत्येक मालिकेचे समान गुण, 120, दिले जातील. पुढील चक्रात प्रत्येक सामन्यासाठी समान गुण पाहायला मिळतील - प्रति सामन्यात जास्तीत जास्त 12,” ESPNcricinfo ने आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डिस यांच्या हवाल्याने म्हटले.
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अखेर 2018 मध्ये इंग्लंड दौरा केला होता. यावेळी ‘विराटसेने’ने यजमान संघाला कडवी झुंज दिली होती पण त्यांना मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा राहुल द्रविड अखेरचा भारतीय कर्णधार होता. 2007 मध्ये द्रविडच्या नेतृत्वात टीमने विक्रमी कामगिरी बजावली होती मात्र त्यानंतर संघाने 2011, 2014 आणि अखेरीस 2018 मध्ये ब्रिटिश दौरा केला पण मालिकेचा निकाल यजमान संघाच्या बाजूने लागला.