World Cup 2011 Final Fixing Investigation: कुमार संगकाराची कसून चौकशी, संतप्त चाहत्यांचा क्रीडा मंत्रालय कार्यालयाबाहेर निषेध

चौकशी सुरु असताना संगकाराच्या चाहत्यांनी क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली.

कुमार संगकाराची चौकशी (Photo Credit: Twitter)

2011 विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final) फिक्स असल्याच्या दाव्यावरून श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराची (Kumar Sangakkara) गुरुवारी क्रीडा मंत्रालयात (Sports Ministry) तब्बल 8 हुन अधिक तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी सुरु असताना संगकाराच्या चाहत्यांनी क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली. श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे (Mahindananda Aluthgamage) यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2011 विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप केला होता. या आरोपांनंतर श्रीलंकेच्या (Sri Lanka) तत्कालीन संघातील कर्णधार संगकारा आणि फलंदाज महेला जयवर्धने यांनी अलुथगमगेचे आरोप फेटाळून लावत पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. श्रीलंकन सरकारनेही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अलुथगमगे यांनी केलेल्या आरोपांविषयी चौकशी सुरु केली आहे. (2011 भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगच्या माजी क्रीडा मंत्र्यांच्या आरोपावर कुमार संगकारा, महेला जयवर्धने यांचं उत्तर, पाहा काय म्हणाले)

newswire.lkच्या वृत्तानुसार संगकारा आणि अन्य क्रिकेटपटूंच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून सतत होणार्‍या छळाविरूद्ध निदर्शने करण्यात आली, असे निषेध आयोजित करणाऱ्या समगी जना बालावेगयाच्या युवा संघटनेने सांगितले. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार साजित प्रेमदासा यांनीही तपासाविरोधात ट्विट केले. दरम्यान, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष अरविंदा डी सिल्वा आणि श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगा यांची यापूर्वीच निवेदने नोंदविण्यात आली आहेत. अलुथमगे म्हणाले, “2011 विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.”

कुमार संगकारा चौकशी

चाहत्यांचा निषेध

सजीथ प्रेमदासा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या भारत-श्रीलंका अंतिम सामन्यात गौतम गंभीर, युवराज सिंह आणि एमएस धोनी यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 6 विकेटने सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले. संगकाराने विश्वचषकानंतर संघाचा कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला होता. या सामन्यात श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 274 धावा केल्या. जयवर्धनेने 103, संगकाराने 30 आणि कुलसेकराने 40 धावा केल्या होत्या. भारताकडून गंभीरने 97 धावा केल्या तर धोनी 91 आणि युवराज सिंह 21 धावा करून नाबाद परतले.