Women's T20 World Cup 2020: न्यूझीलंडविरुद्ध तुफान फलंदाजी करणाऱ्या भारताच्या 16 वर्षीय शेफाली वर्मा ने रचला इतिहास, स्ट्राइक रेटमध्ये सर्वांवर केली मात
तीन डावात शेफालीचा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्ट्राइक रेट आहे. एकूणच करिअर स्ट्राइक रेटच्या बाबतीत शेफालीने एक नवीन विक्रम नोंदविला आहे.
भारतीय (India) क्रिकेट टीमची युवा फलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) यंदाच्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात (Women's T20 World Cup) सतत कहर करत आहे. गुरुवारी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या 9 व्या लीग सामन्यात शेफालीने न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध एक विशेष कामगिरी नोंदविली. शेफालीने न्यूझीलंडविरुद्ध 46 धावांचा डाव खेळला आणि संघाच्या विजयात मोलाचा वाट निभावला. एका टोकाला दिग्गज फलंदाज आऊट होत असताना शेफालीने सावध फलंदाजी केली. 16 वर्षीय खेळाडूच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. शेफालीला तिच्या मजबूत खेळीसाठी सलग दुसऱ्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले. न्यूझीलंडला पराभूत करत सेमीफायनलमध्ये पोचणारी टीम इंडिया पहिला संघ ठरली. (Women's T20 World Cup 2020: टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल फेरीत, न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत करून केली पूर्ण विजयाची हॅटट्रिक)
या सामन्यात शेफालीने 34 चेंडूत 46 धावांची खेळी केली ज्यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यंदाच्या स्पर्धेत शेफालीने आजवर 3 सामन्यांत 172.7 च्या स्ट्राईक रेटने एकूण 114 धावा केल्या असून त्यामध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. तीन डावात शेफालीचा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्ट्राइक रेट आहे. एकूणच करिअर स्ट्राइक रेटच्या बाबतीत शेफालीने एक नवीन विक्रम नोंदविला आहे. शेफालीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 147.97 च्या स्ट्राइक रेटने 438 धावा केल्या आहेत. महिला आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोणत्याही फलंदाजानेकारकिर्दीत इतक्या वेगवान गतीने 200 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. तिने दक्षिण आफ्रिकेची क्लो ट्राईऑन आणि ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली यांना मागे टाकले आहे.
आयसीसीनेही शेफालीचे कौतुक केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला बोलावल्यावर भारताने 8 गडी गमावून 133 धावा केल्या. शेफालीशिवाय तानिया भाटियाने 23 चेंडू 25 धावा केल्या. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या समोर न्यूझीलंडने 6 विकेट गमावून 129 धावा फटकावल्या. यासह स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवून भारताने नाबाद मोहीम सुरू ठेवली. भारतीय संघाने 3 सामन्यांतून 6 गुणांसह गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. त्यांनी मागील दोन सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशचा पराभव केला.