Women’s CWC 2022: महिला विश्वचषकपूर्वी ICC ची महत्वाची घोषणा; आता किमान 9 खेळाडूंसह मैदानात उतरू शकणार, पण आहे ‘ही’ अट!
ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 मधील संघांना कोविड-19 मुळे प्रभावित झाल्यास केवळ नऊ खेळाडूंसह संघ मैदानात उतरू शकतील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज जाहीर केले. आयसीसीने संघांना पाठिंबा देण्यासाठी आणि स्पर्धा शक्य तितक्या सामान्यपणे सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 4 मार्चपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा न्यूझीलंडमध्ये खेळली जाणार आहे.
ICC Women’s CWC 2022: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे क्रिकेटच्या अनेक नियमीत बदल झाले आहेत. खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवले जात असून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यावर तो सॅनिटाइज केला जात आहे. जर एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर प्रत्येक खेळाडूची कोविड चाचणी केली जाते. तसेच लक्षणे असलेल्या खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात येते. मात्र, खेळ थांबत नाही ही चांगली गोष्ट आहे. आता ICC ने महिला विश्वचषक 2022 (Women's World Cup) साठी आणखी एक मोठा नियम जाहीर केला आहे. आयसीसीच्या (ICC) नवीन नियमानुसार जर एखाद्या संघात कोरोना पसरला तर तो किमान 9 खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो. आयसीसीने संघांना पाठिंबा देण्यासाठी आणि स्पर्धा शक्य तितक्या सामान्यपणे सुरु ठेवण्याची व्यवस्था म्हणून हा नियम जाहीर केला आहे. तर इतर घोषणांमध्ये बरोबरीत राहिलेल्या सामन्यांचा निर्णय घेण्यासाठी अमर्यादित सुपर ओव्हर आणि संघांसाठी कठोर प्रोटोकॉल यांचा समावेश आहे.
आयसीसी कार्यक्रम प्रमुख ख्रिस टेटली (Chris Tetley) यांनी क्राइस्टचर्च येथे एका माध्यम संवादात सांगितले की, “कोविडच्या दृष्टीकोनातून या अनोख्या परिस्थितीचा विचार करून आम्ही खेळाचे व्यवस्थापन ज्या पद्धतीने करतो त्या दृष्टीने आम्हाला थोडे लवचिक असणे आवश्यक आहे. म्हणून प्रथम, आम्ही पथक वाढवण्यास परवानगी दिली आहे. अधिकृत प्लेइंग 15 आणखी 15 खेळाडूंवर सेट केला आहे,आम्ही संघांना अतिरिक्त प्रवासी राखीव खेळाडू आणण्याची परवानगी दिली आहे जेणेकरुन आवश्यक असल्यास ते ते तात्पुरत्या आधारावर आता-बाहेर करू शकतील. खेळाडूंना COVID-19 ची लागण होण्याची शक्यता आहे परंतु नंतर परत येण्याची संधी आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना विश्वचषकात त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे आणि जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्व काही करणे महत्त्वाचे आहे.”
दरम्यान, आयसीसीचा हा नियम बीसीसीआय प्रेरित दिसत आहे ज्यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी हाच नियम बनवला आहे. लक्ष्यात घ्यायचे की अलीकडेच अंडर-19 विश्वचषक दरम्यान टीम इंडियासह अनेक संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आली होती. टीममध्ये कोरोना घुसल्यानंतर भारताला प्लेइंग इलेव्हनला उतरवण्यातही अडचण आली होती. सपोर्ट स्टाफला मैदानात उतरावे लागले, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहून आता आयसीसीने 11 ऐवजी 9 खेळाडूंसह खेळ सुरू ठेवण्याचा नियम लागू केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)