IPL Auction 2025 Live

WI vs SL T20I: हॅटट्रिक घेणाऱ्या Akila Dananjaya याच्या सहा चेंडूत Kieron Pollard ने खेचले 6 षटकार, युवराज सिंहच्या विक्रमाशी केली बरोबरी

पोलार्डने एका षटकात 6 षटकार ठोकले. हॅटट्रिक घेणाऱ्या धनंजयाच्या ओव्हरमध्ये हे 6 षटकार ठोकले.

वेस्ट इंडिज कर्णधार कीरोन पोलार्ड (Photo Credit: Twitter/ICC)

Kieron Pollard 6 Sixes: वेस्ट इंडीज (West Indies) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली व पहिल्याच सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून कमाल कामगिरीची झलक पहायला मिळाली. मालिकेचा पहिला सामना अँटिगा (Antigua) येथे खेळण्यात आला जिथे वेस्ट इंडीज संघाने फक्त विजय मिळवला नाही, तर कॅरेबियन संघाचा कर्णधार कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) आणि श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने (Akila Dananjaya) एक आश्चर्यकारक पराक्रम केला जो बहुधा दिसून येत नाही. पोलार्डने एका षटकात 6 षटकार ठोकले. हॅटट्रिक घेणाऱ्या धनंजयाच्या ओव्हरमध्ये हे 6 षटकार ठोकले. या सामन्यात कॅप्टन पोलार्डने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंका संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 131 धावांवर रोखले. त्यामुळे क्रिस गेल आणि कीरोन पोलार्डसारख्या दिग्गजांनी सजलेल्या संघासमोर 132 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु सलग तीन चेंडूंत वेस्ट इंडीजचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यावर हे लक्ष्य खूप मोठे दिसू लागले.

131 धावांचा बचाव करण्यासाठी धनंजयाने श्रीलंकेकडून दुसरी ओव्हर टाकली ज्यात त्याने 8 धावा दिल्या, पण डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये धनंजयाने इव्हिन लुईस, क्रिस गेल आणि निकोलस पूरन यांना सलग तीन चेंडूंवर पॅव्हिलियनमध्ये पाठवत हॅटट्रिक घेतली. यानंतर फलंदाजीस आलेल्या पोलार्डने धाव घेतली आणि त्यानंतर लेन्डल सिमन्सने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला. अशाप्रकारे श्रीलंकेने पुनरागमन केले आणि सिमन्सला पाचव्या ओव्हरमध्ये माघारी पाठवले, परंतु त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये सामना उलटला. हॅटट्रिक घेत गोलंदाजीला आलेल्या धनंजयाच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडू पासून पोलार्डने त्याची धुलाई केली आणि एका पाठोपाठ एक सहा षटकार लगावले. या पराक्रमबरोबरच पोलार्डने युवराज सिंह (Yuvraj Singh), हर्शल गिब्सच्या (Herschelle Gibbs) विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. युवराजने टी-20 तर गिब्सने वनडे सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

अकिला धनंजया

इतकंच नाही तर पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकणारा पहिला कॅरेबियन क्रिकेटपटू ठरला आहे. शिवाय, पोलार्ड कर्णधार म्हणून हा पराक्रम करणारा जगातील एकमेव क्रिकेटर ठरला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले गेले आहेत, परंतु कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत हा चमत्कार करता आलेला नाही. अशास्थितीत, पोलार्डने ऐतिहासिक आकड्यांची नोंद केली आहे.